पालघर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 नुकतीच पार पडली. या निवडणूकी दरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं स्वीप ( SVEEP ) कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणजे १८ नोव्हेंबर २०२४ ला आर्यन शाळेच्या मैदानावर रांगोळीच्या माध्यामतून १८० बाय १५६ म्हणजे २८ हजार ८० चौरस फूट आकाराचा महाराष्ट्राचा नकाशा साकारण्यात आला होता. पालघर मधल्या म.नि.दांडेकर हायस्कूल, आर्यन इंग्लिश मीडीयम स्कूल आणि भगिनी समाज माध्यमिक विद्यालय या 3 शाळां मधल्या 1500 विद्यार्थ्यांनी मानवी साखळी सह ही महाराष्ट्राच्या नकाशाची रांगोळी तयार केली होती. त्याच भव्य रांगोळीची आता वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया ( World Records India ) मध्ये नोंद झाली आहे.
पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा, त्याचा आकार आणि मानवी रांगोळी हा विक्रम झाल्याची घोषणा करण्यात आली. या विक्रमाची नोंद झाल्याचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलं आहे. यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे अध्यक्ष पवन सोलंकी उपस्थित होते. महारांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करतांना झालेला हा विक्रम पालघर जिल्हयासाठी आनंदाची बाब आहे.
पालघर सारख्या आदिवासी बहुल भागात अशा प्रकारचा विक्रम होतांना मी प्रथमच पाहत असल्याचं मत यावेळी पवन सोळंकी यांनी व्यक्त केलं. शासनाने दिलेली जबाबदारी पाडताना हा विक्रम सुध्दा नोंदवला गेलेला आहे. त्यामुळे हे कायम स्मरणात राहिल अशा भावना यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केल्या.