गुजरात राज्यातल्या दगडखाणीतल्या पाण्यात कारच्या डिक्की मध्ये सापडला मृतदेह
पालघर : गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस गुजरात राज्यातल्या भिलाड इथं असलेल्या दगडखाणीत बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह त्यांच्या कार मध्ये पाण्यात सापडून आला आहे. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने जेव्हा कार पाण्यातून बाहेर काढली तेव्हा कारच्या डिक्की मध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच 4 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
पहा व्हिडीओ :
अशोक धोडी हे पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्या मधल्या वेवजी गावचे रहिवासी होते. आणि ते शिवसेना गटाचे स्थानिक पदाधिकारी देखील होते. घोलवड पोलीस ठाण्यात अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली होती कि, 20 जानेवारी ला जेव्हा अशोक धोडी आपल्या लाल रंगाच्या ब्रेझा कार मधून गुजरातकडे जात असताना जसं कि सीसीटीव्ही फुटेज मध्ये कार दिसून येत त्यादरम्यान झाई बोरीगाव जवळ त्याचं अपहरण करण्यात आलं आहे. धोडी यांच्या कुटुंबीयांनी गावातीलचं एका व्यक्तीवर धोडी यांच्या अपहरणाचा आरोप लावला होता.
माझ्या वडिलांची हत्या केली त्या सर्वांना लवकरात लवकर शोधून पोलिसांनी त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी केली आहे. तसंच आरोपींपासून आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती आकाश धोडी यांनी व्यक्त केली आहे.