पालघर : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार सारख्या अतिदुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI Jawhar ) गेल्या अनेक दशकांपासून विद्यार्थी घडविण्याचे काम अविरतपणे करत आहे. या उपक्रमाला अधिक गती मिळावी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर यांच्या संयुक्त विद्यमानं ३१ जानेवारी ला जव्हार च्या आयटीआय मध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. याठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ( Pandit Deendayal Upadhyay Rojgar Mela ) आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना रोजगार मेळावा हा संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळे या संधीचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपापले करिअर घडवावे असं आवाहन जव्हार आयटीआय चे प्राचार्य श्याम अंबाळकर यांनी केलं आहे.