पालघर : दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे यासारख्या विदुषीनंतर मानवशास्त्राच्या संदर्भात विशेष उल्लेखनीय नाव घेण्याजोगी एकही महिला संशोधक दिसत नाही. बुद्धी प्रामाण्यवादी दृष्टीने या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनी तयार होणे गरजेचे आहे. मानवशास्त्र संशोधनाची यापुढील धुरा मुलींनी वहावी असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि समाजशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद बोकील यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले. मराठी विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. प्रतिभा कणेकर लिखित ‘इरावती कर्वे भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा (Book Launching Ceremony) मिलिंद बोकील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना ते म्हणाले कि, बहुविविधता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून जात ही केवळ भारतातच दिसून येते. जातीने कुणीही श्रेष्ठ ठरत नाही. आपला समाज कसा आहे? आणि तो असा का आहे? हा प्रश्न आपल्याला पडणे गरजेचे आहे. निकोप समाजासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक आहे. एकाच कुळात, गोत्रात आणि जातीत लग्न केल्याने त्याचा परिणाम जनुकीय ऐवजावर होतो. या संदर्भात त्यांनी पारशी समाजाचे उदाहरण देखील दिले. यावेळी भारतीय समाज संस्कृती संदर्भातील इरावती कर्वे यांच्या विचारांचा परामर्श मिलिंद बोकील यांनी घेतला. मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी समाजशास्त्रा संदर्भात केलेले लिखाण म्हणून डॉ. प्रतिभा कणेकर बाईंनी केलेल्या महत्वपूर्ण कार्याचा गौरव करत त्यांच्या लेखनाची चिकित्सा देखील त्यांनी केली. ग्रंथातील संदर्भ अचूक असून त्यांनी कोणत्याही तथ्याशी तडजोड केली नाही. ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याला दिलेली देणगी आहे असं हि ते म्हणाले.
चरित्रलेखन हे केवळ एका व्यक्तीची लेखन कामगिरी नसून तो एक सामुहिक प्रयत्न असतो. इरावती कर्वे यांचे संशोधन कार्य अभ्यासताना अनेकदा स्तिमित व्हायला झालं असं मनोगत कणेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. लेखन करताना सहकार्य करणा-या अनेक व्यक्तींचे त्यांनी आभार मानले. तर डॉ.किरण सावे यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रतिभा कणेकर यांचे महाविद्यालयीन आणि साहित्य क्षेत्रातील योगदान विशद केले. तसचं ग्रंथ प्रकाशनाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष धनेश वर्तक, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, उपप्राचार्य डॉ.तानाजी पोळ, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष सुधीर दांडेकर, लेखक प्रसाद कुमठेकर, कवी, प्रकाशक गीतेश शिंदे,पालघर मधील अनेक साहित्यिक आणि सामजिक संस्थांचे पदाधिकारी, साहित्य प्रेमी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दर्शना चौधरी यांनी केले तर आभारप्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा.विवेक कुडू यांनी केले.