पालघर : निसर्ग ही मानवाला मिळालेली अमूल्य अशी देणगी आहे. जर आपण निसर्गाशी मैत्री केली, जोडले गेलो तर आपण हळूहळू त्याच्याशी त्याच्या भाषेत संवाद साधू शकतो. मग निसर्गाची अबोलकी भाषा आपल्याला कळू लागते. याच निसर्गाने आपल्या असंख्य गोष्टींचा साठा दिला. त्यात पक्षी, प्राणी सुद्धा आलेच. हेच पक्षी आणि प्राणी आजच्या काळात मानवाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेले दिसून येतात.
पोपटाला आपण बोलताना पहिलंच असेल. जेव्हा त्याला कंठ फुटतो तेव्हा तो त्या कुटुंबातील व्यक्तीशी त्यांच्या भाषेत बोलू लागतो. हे तर झालं पोपटाच्या बाबतीत. पण कावळ्याला कधी बोलताना पाहिलंय का हो. तसं तर कावळ्याचा कर्कश आवाज ऐकून आपण सर्व चिढत असतो. आणि त्याला पळवून ही लावतो. पण पालघर जिल्ह्यात एक असा ही कावळा आहे जो आपल्या सुंदर आवाजात मराठी बोली भाषेत व्यक्तींशी संवाद ही साधतो. हे एक नवलच म्हणावं लागेल.
पहा व्हिडीओ :
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्या मधल्या गारगाव मध्ये मंगल्या मुकणे यांच्या घरात राहणारा हा काल्या. मंगल्या यांच्या मुलांना ३ वर्षापूर्वी एका झाडाखाली हे १४-१५ दिवसांच एक कावळ्याच पिल्लू सापडून आलं होत. आणि ही मुलं त्याला आपल्या घरी घेऊन आली. त्याची देखभाल करू लागली. त्यानंतर हा कावळा त्यांच्या घरातील सदस्यच बनून गेला. बालपणी जशी घरातली मुलं आपल्या कुटुंबाची भाषा ऐकून ऐकून ती आत्मसात करतात तशी या कावळ्याने ही या कुटुंबातील भाषा आत्मसात केली. आणि आता तो काव काव या कर्कश आवाजा ऐवजी या कुटुंबातील सदस्यांना आपल्या गोड आवाजात त्यांच्या नावाने हाक मारतो. एवढंच नव्हे तर तो काकू, काका, चूप, हो, हट, शाळेत यासारखे शब्द बोलतो. तो माणसा सारखा हसतो काय, माणसा सारखा खोकलतो, माणसा सारखा बोलून दमतो काय… आणि स्वतःचं काल्या नाव घेतो काय… त्याच्याशी बोलणाऱ्या व्यक्तींना माणसाच्या भाषेत उत्तरं देतो काय…
या कावळ्याच हे माणसा सारखं बोलणं, वागणं पाहून तर आश्चर्याचा धक्काच बसतो.
आजच्या या जगात कावळ्याला कंठ फुटणं आणि त्याचं माणसाच्या बोली भाषेत बोलणं हे खरो खरचं देवाचा चमत्कार मानला तर काही वावगं ठरणार नाही.