पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे, सार्वजनिक सुरक्षेची खात्री करण्याचे आणि जिथे आवश्यक असेल तिथे त्वरित मदत पुरवण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे 767 हून अधिक घरांचं नुकसान झालं असून विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे धाकटी डहाणू भागातील 50 मासेमारी बोटी देखील नुकसानग्रस्त झाल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात सर्वाधिक 230 घरांचं नुकसान झालं. विक्रमगड आणि वाडा या भागात प्रत्येकी 92, जव्हारमध्ये 89, मोखाड्या मध्ये 87, पालघर मध्ये 85, तलासरीत 63 आणि वसई मध्ये जवळपास 29 घरांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान वेदी गावात 65 वर्षीय मोरेश्वर लोहार ही व्यक्ती बकऱ्या चारण्यासाठी गेली असताना वादळी वाऱ्यांमुळे जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेला चुकून पाय लागल्याने मृत्युमुखी पडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी परिस्थितीची माहिती घेऊन तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत.