पालघर : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार आपत्कालीन सज्जतेसाठी आज पालघर जिल्ह्यातल्या तारापूर मध्ये “ऑपरेशन अभ्यास ” घेण्यात आला. टॅप्स कॉलनी गेट समोरील विजय कॉलनी इथे असलेल्या मैदानात हे मॉक ड्रिल घेण्यात आलं.
पालघर जिल्ह्यातल्या तारापूर या ठिकाणी आज केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ब्लॅकआऊट मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आलं होत. तारापूर अणुशक्ती केंद्र हे अति संवेदनशील असल्याने या भागात शत्रू कडून हवाई हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा युद्धजन्य परिस्थितीत जर हवाई हल्ला झाला तर नागरिकांनी आपला जीव कशा पद्धतीने वाचवावा आणि जखमी नागरिकांना कशा पद्धतीने सहकार्य करावं याच प्रात्यक्षिक आज तारापूरच्या ब्लॅक आऊट मॉक ड्रिल मध्ये पाहायला मिळालं. नागरी संरक्षण दल, एनडीआरएफ आणि पालघर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त पुढाकाराने पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या विजय कॉलनीतील मैदानात हा ऑपरेशन अभ्यास घेण्यात आला.