डहाणू तालुक्यात सर्वाधिक सर्वेक्षण
पालघर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ( Pradhan Mantri Gramin Awas Yojana ) (PMAY-G) टप्पा २ अंतर्गत पात्र कुटुंबांची निवड करण्यासाठी ‘Awaas Plus २०२४’ सर्वेक्षण सध्या पालघर जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. 4 मे पर्यंत जिल्ह्यात 11,465 कुटुंबांचं सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. यामध्ये 10240 सर्वे हे सहाय्यकांनी तर 1558 सर्वे हे लाभार्थ्यांनी स्वतः केले आहेत.
PMAY-G चा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातल्या घर नसलेल्या किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे. ‘Awaas Plus’ ही याच योजनेतली पूरक सर्वे मोहीम असून, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून 2018 नंतर वंचित राहिलेल्या पात्र कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना नव्याने याद्यां मध्ये समाविष्ट केलं जातं आहे.
तालुकानिहाय सर्वेक्षण माहिती :
डहाणू तालुक्याने या मोहिमेत आघाडी घेतली असून या भागात आतापर्यंत 2607 कुटुंबांचं सर्वेक्षण झालं आहे. त्यापाठोपाठ पालघर – 2300, मोखाडा – 2212 , विक्रमगड – 2066, वाडा – 1004 इतकं सर्वेक्षण करत या तालुक्यांनी ही लक्षणीय प्रगती दर्शवली आहे. तर तलासरी मध्ये – 818, जव्हार मध्ये – 530 आणि वसई – 261 इतकं सर्वेक्षण झालं आहे.
आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात 2418 सर्वेक्षणे पार पडली. त्यात मोठा वाटा हा डहाणू, विक्रमगड, मोखाडा, वाडा आणि पालघर या तालुक्यांचा होता. पात्र नागरिक आपल्या गावातल्या सर्वेक्षण पथकाशी संपर्क करून हे सर्वेक्षण करू शकतात. तसचं स्वतःही ‘Awaas Plus 2.0’ अॅपवरून स्वयं-सर्वे करू शकतात. अशी माहिती प्रकल्प जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते यांनी दिली आहे.
दरम्यान पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सर्व संबंधित ग्रामसेवक,ग्राम पंचायत अधिकारी यांना सर्वेक्षण नियोजनबद्ध आणि अचूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने प्रत्येक तालुक्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवत वेळेत लक्ष्य पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
प्रतिक्रिया :
1) पालघर जिल्ह्यातील Awaas Plus 2.0 सर्वेक्षण वेगाने सुरू असून जिल्हा प्रशासन आणि पथकांची कार्यशैली समाधानकारक आहे. ज्या तालुक्यांमध्ये कामाची गती कमी आहे, तिथे लवकरच मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
मनोज रानडे – मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद…
2) पात्र नागरिक आपल्या गावातल्या सर्वेक्षण पथकाशी संपर्क करून हे सर्वेक्षण करू शकतात. तसचं स्वतःही ‘Awaas Plus 2.0’ अॅपवरून स्वयं-सर्वे करू शकतात.
डॉ.रूपाली सातपुते – प्रकल्प संचालिका, प्रकल्प जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा…