पालघर : पालघर जिल्ह्यातल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामधून ( arapur Nuclear Power Project ) आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या तयारीची रंगीत तालीम संपन्न झाली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली ( National Disaster Management New Delhi ) आणि पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( Disaster Management Palghar ) यांच्या संयुक्त विद्यमान जिल्ह्या मध्ये विविध ठिकाणी राष्ट्रीय रंगीत तालमीचे ( National Mock Drill ) आयोजन करण्यात आलं होतं.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातून रेडिएशन गळती ( Radiation Leakage ) झाल्यास जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यामध्ये 19 गावां मध्ये ही राष्ट्रीय रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. या सर्व गावांमध्ये नागरिकांना 31 हजार 381 आयोडीन युक्त गोळ्याचे वाटप करण्यात आले. ज्या स्थानिकांचं घर बंदिस्त स्वरूपाचं नाही अशा 940 स्थानिकांना निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसचं 45 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं.
या रंगीत तालमीमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली , राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प , भारतीय नौदल , भारतीय तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सिविल डिफेन्स, पोलीस दल, गृहरक्षक दल , आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग नाशिक आणि ठाणे इथले आपदा मित्र तसचं संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रंगीत तालीम मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक विनायक नरळे , निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे , राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे लेफ्टनंट जनरल सईद हुस्नैनी, एनडीआरएफ च्या ५ व्या बटालियनचे मुख्य अधिकारी संतोष सिंग, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक सतीश खडके , सचिव परदेशी , अप्पर सचिव संजीव राणे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम तसचं संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.