पालघर : लोकसभेत पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी विरार – दहाणू आणि चर्चगेट दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो उपनगरी प्रवाशांच्या समस्या प्रभावीपणे मांडत लोकल ट्रेन फ्रीक्वेन्सी आणि सुविधा वाढवण्याची ठोस मागणी केली.
या मार्गावर दररोज प्रचंड प्रवासी संख्या असून, सकाळी आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये प्रवास अत्यंत त्रासदायक बनतो. या पार्श्वभूमीवर ट्रेन गाड्यांची संख्या, वेळा आणि स्थानकांची सुविधा यामध्ये लक्षणीय सुधारणा आवश्यक असल्याचं मत त्यांनी मांडलं.
खासदार डॉ. सवरा यांनी लोकसभेत अधोरेखित केलेले प्रमुख मुद्दे :
लोकल फ्रीक्वेन्सी वाढवावी :
– सकाळी ६ वाजल्यापासून आणि सायंकाळी पीक अवर्समध्ये अधिक गाड्या चालवाव्यात.
– दररोजच्या गरजेनुसार नियोजित वेळापत्रक तयार करण्यात यावे.
डब्यांची संख्या वाढवावी :
– सध्या १२ डब्यांची असलेली लोकल १५ डब्यांपर्यंत वाढवून प्रवाशांची गर्दी कमी करावी.
नवीन लोकल्स आणि श्रेणी वाढवाव्यात :
– विरार – दहाणू मार्गावर एसी लोकल्स सुरू कराव्यात.
– सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या नॉन-एसी लोकल्सची संख्या वाढवावी.
स्थानकांवरील सुविधा सुधाराव्यात :
– स्वच्छ स्वच्छतागृह, डिजिटल साइनबोर्ड, आणि बसण्याची व्यवस्था स्थानकांच्या दोन्ही टोकांवर करण्यात यावी.
नवीन सेवा सुरू कराव्यात :
– सकाळी ४ वाजता दहाणूहून चर्चगेटकडे लोकल सेवा सुरू करावी.
– संध्याकाळी ६ वाजता विरारहून दहाणूकडे अतिरिक्त लोकल चालवावी.
– सध्या दहाणूपर्यंत चालणाऱ्या लोकल्स उंबरगाव स्थानकापर्यंत वाढवाव्यात.
या मागण्यांमुळे सामान्य प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल, प्रवास अधिक सुकर आणि वेळेवर होईल, तसेच उपनगरी भागाचा विकास देखील गती घेईल.