पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर – तारापूर औद्योगिक ( Boisar Tarapur MIDC ) क्षेत्रातल्या प्लॉट नंबर एफ 13 मध्ये असलेल्या मेडली फार्मास्युटिकल्स कंपनीत ( Medley Pharmaceuticals Company ) वायू गळती होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत इतर 2 कामगारांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर बोईसर च्या शिंदे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे.
पहा व्हिडीओ :
पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान मेडली फार्मा या कंपनीत एलबेंडाजोल या केमिकलचं उत्पादन घेत असताना नायट्रोजन रिएक्शन टॅंक मध्ये गॅस गळती झाल्याने हा अपघात घडला. या गॅस गळती मुळे कंपनीतील 6 कामगारांना बाधा झाली. त्यानंतर त्यांना बोईसर मधल्या शिंदे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जिथे चार कामगारांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेत ४३ वर्षीय कल्पेश राऊत, ४६ वर्षीय बंगाली ठाकूर, ३१ वर्षीय धीरज प्रजापती आणि कमलेश यादव या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर रोहन शिंदे आणि निलेश हाडळ या दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांच्यावर शिंदे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे.
ज्यावेळेस हि घटना घडली त्यावेळी कंपनीत जवळपास ३६ कामगार काम करत होते. मात्र जिथे हे उत्पादन घेणे सुरु होत त्या ठिकाणी हे पाच कामगार होते. ज्यामुळे त्यांना वायू गळती होऊन बाधा झाली. घटनेनंतर इतर कामगारांना तात्काळ कंपनी बाहेर काढण्यात आलं. या प्रकरणाचा अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत.