मुंबई : केंद्र शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला ( Marathi language ) अभिजात भाषेचा ( Classical Language ) दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस ( Classical Marathi Language Appreciation Day ) तर ३ ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह ( Marathi Language Week ) म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.
अभिजात मराठी भाषा सप्ताह मध्ये मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुली असेल. “अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा” ( Classic Marathi-My Expectations ) या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ऑगस्ट मीडिया या संस्थेतर्फे केले जाईल. ही वक्तृत्व स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्रातील वेगवेगळे महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांना प्रवेश मिळेल.
स्पर्धकांनी विषयाचे आकलन करून तो विषय आपल्या पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामधून जास्तीत जास्त १०० उत्तम स्पर्धकांची निवड “मराठी भाषा दूत” ( Marathi Language Ambassadors ) म्हणून करण्यात येईल. तसेच, सर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५, रात्री १२ पर्यंत आहे.
या स्पर्धेसाठी १८ ते २१ या वयोगटातील जास्तीत जास्त युवकांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.