लवकरच होणार सार्वजनिक सुनावणी
पालघर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी मुरबे पोर्ट प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या प्रकल्पासाठी निवडण्यात आलेल्या जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रा. लि. (JSW Murbe Port Private Limited – JSWPPL) या विकासक कंपनीने, मुरबे येथे बहूहंगामी मल्टी-कार्गो ग्रीनफील्ड डीपवॉटर पोर्टसाठी तयार केलेला मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल (EIA) २१ जुलै २०२५ ला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) सादर केला आहे. यामुळे प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीच्या प्रक्रियेतील सार्वजनिक सुनावणीचा टप्पा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील मुरबे गावाजवळ उभारला जात आहे. या बंदराची एकूण क्षमता १३४.०७ दशलक्ष टन प्रति वर्ष (MTPA) असेल. आणि ते विविध प्रकारच्या मालाची वाहतूक करू शकेल, ज्यात बल्क आणि ब्रेक बल्क सिमेंट, स्टील, एलपीजी, एनपीजी, तसेच कंटेनर यांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या मुख्य घटकांमध्ये १० किमी लांबीचे दक्षिण ब्रेकवॉटर, १.३ किमी लांबीचे उत्तर ब्रेकवॉटर, १६ धक्के (berths) आणि १०३५ एकर जागा समाविष्ट आहे.
कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा :
प्रकल्पासाठी आवश्यक पाणी सिंचन विभागाच्या सूर्या प्रकल्पातून घेण्याचे नियोजन आहे. आणि विजेचा पुरवठा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडून (MSDCL) होईल. या बंदराला NH-48 आणि मुंबई- दिल्ली द्रुतगती मार्गाद्वारे जोडले जाणे अपेक्षित आहे. तसेच, डेडीकेटेड फ्रंट कॉरिडॉरशी (DFCC) जोडण्यासाठी १३ किमी लांबीचा रेल्वे मार्ग विकसित केला जाईल, ज्यामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होईल.
प्रकल्पाची सद्यस्थिती :
मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल (EIA) सादर झाल्यामुळे आता सार्वजनिक सुनावणीची प्रक्रिया सुरू होईल. निर्धारित वेळेनुसार एप्रिल २०२६ मध्ये प्रकल्पाचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे. आणि मार्च २०२९ पर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे कोणत्याही नागरिकांचे
विस्थापन होणार नाही असे कंपनीने म्हणणे आहे.
मुरबे पोर्ट विषयी :
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे विकसित होत असलेले मुरबे पोर्ट, राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना देणारे एक महत्त्वाकांक्षी ग्रीनफील्ड डीपवॉटर पोर्ट आहे. हे बंदर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या दूरदृष्टीचा परिणाम असून, जेएसडब्यू मुरबे पोर्ट प्रा. लि. या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे.
उद्दिष्ट :
मुरबे पोर्टचे मुख्य उद्दिष्ट केवळ एक अत्याधुनिक बंदर उभारणे नसून, जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे. हे बंदर भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करेल, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला गती मिळेल.
प्रमुख वैशिष्ट्ये :
* बहू-हंगामी कार्यान्वयन : हे बंदर कोणत्याही हवामानात २४/७ कार्यरत राहील, ज्यामुळे व्यापारात सातत्य राखले जाईल.
* अखंड कनेक्टिव्हिटी : राष्ट्रीय महामार्ग आणि डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी (DFC) थेट जोडणीमुळे वाहतूक जलद आणि सुलभ होईल.
* मल्टी-कार्गो हाताळणी : सिमेंट, स्टील, एलपीजी, एनपीजी, कंटेनर आणि इतर विविध प्रकारच्या मालाची हाताळणी करण्याची क्षमता.
* पर्यावरणाची काळजी : विकासक पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध असून किनारी भागातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, ज्यामुळे विकासासोबत पर्यावरणाचा समतोल साधला जाईल.
* भविष्यासाठी सज्ज : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी नियोजन वापरून, मुरबे पोर्ट केवळ आजच्याच नव्हे तर भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी तयार होत आहे.
मुरबे बंदराचा विकास हा केवळ स्थानिक समाजाच्या समृद्धीपुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या आर्थिक वृद्धीचा मुख्य आधारस्तंभ ठरेल आणि भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था घडविण्याच्या राष्ट्रीय ध्येयात धोरणात्मक योगदान देईल.