पालघर : “फिटनेस की डोस – अर्धा घंटा रोज” या घोषवाक्याचा प्रसार करून नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेस बद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस दलाकडून सायक्लोथॉन चं आयोजन करण्यात आलं होतं. पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय इथून या उपक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली.
या उपक्रमात दोन गट ठेवण्यात आले होते. त्यात १० कि.मी. आणि २५ कि.मी. या सायक्लोथॉनचा समावेश होता. या सायक्लोथॉन मध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसह जिल्ह्यातल्या तब्बल २५५ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी देखील या सहभाग सायक्लोथॉन मध्ये सहभाग घेतला.
यावेळी सायक्लोथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींचा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या सायक्लोथॉनमुळे नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली बाबत जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी व्यक्त केला.