खासदार डॉ. हेमंत सवरा यांची परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडे मागणी
पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पत्र लिहून वसई पासपोर्ट कार्यालयातले अर्ज स्वीकृती क्षमता वाढविण्याची मागणी केली आहे. ६ डिसेंबर २०२२मध्ये सुरू झालेलं वसई पासपोर्ट कार्यालय हे पालघर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं आहे. या कार्यालयामुळे नागरिकांना पासपोर्ट आणि पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) साठी मुंबई किंवा ठाणे इथं जाण्याची गरज उरली नाही. मात्र, सध्या या कार्यालयात दररोज केवळ ६३ पासपोर्ट अर्ज आणि २ PCC अर्ज स्वीकारले जातात.

पालघर जिल्ह्याची लोकसंख्या ४५ लाख असून त्यापैकी जवळपास २५ लाख लोक वसई तालुक्यात राहतात. लोकसंख्या लक्षात घेता सध्याची अर्ज स्वीकृती मर्यादा अत्यंत अपुरी ठरत आहे. या भागातले नागरिक मोठ्या प्रमाणात परदेशात रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि विविध कारणांसाठी जात असतात. अशावेळी त्यांना वेळेवर अपॉइंटमेंट मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. या सर्व बाबींचा विचार करून खासदार डॉ. सवरा यांनी परराष्ट्र मंत्रालयाला वसई पासपोर्ट कार्यालयाची अर्ज स्वीकृती क्षमता वाढवावी, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.
” वसई पासपोर्ट कार्यालयामुळे पालघर जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, वाढत्या मागणीचा विचार करता अर्ज स्वीकृती क्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.”
डॉ. हेमंत सवरा – खासदार, पालघर लोकसभा

















