पालघर : पालघर जिल्ह्यातल्या (Palghar District ) बहाडोली ( Bahadoli ) गावासाठी वन विभागाकडून “बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग” ( “Bahadoli Jamun Processing Industry” ) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जांभूळ ( Indian Blackberry ) उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देत गावाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे.
बहाडोली गावात सुमारे 60 ते 70 टक्के शेतकरी जांभूळ उत्पादक असून गावाच्या अर्थकारणा मध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जांभूळ हंगामाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असला तरी हंगामाच्या शेवटी बाजारभाव घसरल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसचं नैसर्गिक आपत्ती, मागणी आणि पुरवठ्यातील असमतोल यामुळे देखील शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर जांभूळ फळाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांकडून जांभूळाची थेट खरेदी करण्यात येणार असून खरेदी प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची थकबाकी न ठेवता शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला देण्यात येणार आहे.
उद्योगामध्ये जांभूळ प्रक्रिया, ग्रेडिंग, उत्पादन निर्मिती, पॅकिंग आणि साठवणूक यांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. 6000 ते 8000 चौ. फूट क्षेत्रामध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसचं तज्ञ, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांचे मानधन कंपनीकडून अदा केलं जाईल.
उद्योगाचे व्यवस्थापन प्रारंभीच्या पाच वर्षांसाठी अनुभवी आणि पात्र संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. Food Licence, Preservatives, Company Act, कामगार कायदे, विपणन (Marketing), आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तसचं विविध तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा विचार करून उद्योगाचे व्यावसायिक पद्धतीने संचालन करण्यात येणार आहे. उद्योग स्थिर झाल्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समिती (JFMC) सक्षम झाल्यास उद्योग व्यवस्थापन हस्तांतरणा बाबत निर्णय घेण्यात येईल.
उद्योगाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी ग्रामसभेमार्फत स्वतंत्र समन्वय आणि देखरेख समिती स्थापन करण्यात येणार आहे. उद्योगाचा मासिक प्रगती अहवाल आणि आर्थिक व्यवहारांची माहिती JFMC समितीस सादर करण्यात येईल. दरवर्षी ग्रामसभेमध्ये उद्योगाच्या कामकाजाचा लेखी अहवाल सादर केला जाणार आहे.
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी उद्योगाचा ताळेबंद तयार करण्यात येणार असून निव्वळ नफ्याच्या नियमानुसार वाटप करण्यात येईल. शासन निर्णयानुसार JFMC समितीस प्राप्त होणारा हिस्सा गाव विकासासाठी वापरण्यात येणार असून ग्रामसभेच्या ठरावानुसार ग्रामपंचायतीकडून विविध विकासकामे राबविण्यात येतील.
या प्रकल्पामुळे बहाडोली गावातील जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी आणि गावाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
















