पालघर : पण लक्षात कोण घेईल का, हा ग्रंथ वर्तमान सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक परिस्थितीवरील विचारमंथन असून वाचकाला हा ग्रंथ विचार प्रवृत्त करणारा आहे असं प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विश्वस्त माणकताई पाटील यांनी केलं. संस्थेचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी यांच्या ‘पण लक्षात कोण घेईल का ’ या ग्रंथाचं छोटेखानी प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या ग्रंथात समाजातील विसंगती, सर्वसामान्य लोकांच्या व्यथावेदना, विविध व्यवस्थांमधील असलेल्या उणिवा, धर्माचे राजकारण अशा अनेक गोष्टी अॅड्. तिवारी यांनी आत्मीयतेने मांडल्या आहेत. हे एका प्रकारचे प्रांजळ स्वमत आहे. समाजाप्रती असलेला आर्त जिव्हाळा या पुस्तकातून व्यक्त होत आहे असं ही त्या म्हणाल्या.
अॅड्. तिवारी यांनी समारंभात आपले मनोगत व्यक्त करताना पुस्तक निर्मितीमागील आपले अनुभव व्यक्त केले. ह.ना.आपटे यांनी ‘पण लक्ष्यांत कोण घेतो’ या कादंबरीतून तत्कालीन परिस्थितीचे चित्रण केले होते. मी धर्म, न्यायदान, निवडणूका, राजकारण, नोकरशाही, लॉकडाऊन यासारख्या विषयांवर मुक्तपणे भाष्य केले आहे. वाचकांनी ते वाचावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
सद्य काळात वाचन हे कमी होत चालले आहे, अनेकांचा बराचसा वेळ समाज माध्यमांमध्ये फुकट जात आहे अशी खंत व्यक्त करुन त्यांनी पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सहकार्य करणाऱ्या प्राचार्य डॉ. किरण सावे, प्रा. विवेक कुडू, डॉ.मनिष देशमुख यांचे आभार मानले. तिवारी हे जन्मतः हिंदी भाषिक असले तरी त्यांचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मराठी भाषेवर असलेल्या आस्थेपोटी मराठी भाषेत वर्तमान समकाल आपल्या लेखणीतून मांडला असल्याची प्रतिक्रीया विश्वस्त कवी आरेम यांनी व्यक्त केली.
प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी प्रास्ताविकात अॅड्. जी.डी. तिवारी यांच्या आधिच्या इंग्रजीमध्ये असलेल्या प्रकाशित पुस्तकांचा आढावा घेतला. आणि वाचक मराठीमध्ये प्रकाशित होणाऱ्या या ग्रंथाला चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार सचिव अतुल दांडेकर यांनी मानले. या प्रकाशन सोहळयास संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, विश्वस्त लक्ष्मीकांत बाजपेई, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर, कोषाध्यक्ष हितेंद्र शाह, सदस्य अमिता राऊत, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा, प्रा. विवेक कुडू आदी उपस्थित होते.