पालघर : वर्ल्ड फिश फोरम ह्या मच्छीमारांच्या जागतिक संघटनेचे सदस्य, एनएफएफ ह्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळ समितीचे उपाध्यक्ष अश्या देशातल्या अनेक नामवंत संस्था ,संघटनांशी जोडलेले जेष्ठ मच्छिमार नेते नरेंद्र उर्फ नंदू पाटील याचं सोमवारी वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.
केंद्र शासनानं धनदांडग्या व्यावसायिक व्यापाऱ्यांच्या मोठ्या ट्रॉलर्सना बॉटम ट्रोलिंग द्वारे मासेमारी करण्यास परवानगी आणि 1980 साली आर्थिक उदारीकरण धोरण जाहीर झाल्यानंतर त्या विरोधात देशभरातल्या मच्छिमारांनी एकत्र येत नॅशनल फिश वर्कर्स फोरम ह्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. थॉमस कोचेरी, मथाया सलढाना, रामभाऊ पाटील आदी दिग्गज नेत्यांनी ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक यशस्वी लढे दिल्ली मध्ये गाजवले. ह्या तीनही मान्यवरां सोबतच महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती ह्या राज्यातल्या सर्वात ताकदवान मच्छिमार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई बंदरकर ह्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन आज नरेंद्र पाटील डब्लूएफेएफ, एनएफएफ ह्या संघटनांचे प्रतिनिधित्व करीत होते.
दिवसा आड त्यांना डायलिसिस करावे लागत असतानाही त्यांनी शेवट पर्यंत मच्छीमारांच्या प्रश्नासाठी दिल्लीतल्या आपल्या फेऱ्या थांबवल्या नाहीत. रविवारी त्याची तब्येत बिघडल्यानं त्यांना वसई मधल्या एका रुग्णालयात दाखल केले होतं. तिथं उपचारा दरम्यान सोमवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या सातपाटी या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.