पालघर : पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अंमली पदार्थ विकण्यासाठी जाणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाला डहाणूत अटक करून त्याच्याकडून 3 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त केला आहे. ज्याची बाजारात किंमत 36 हजार रूपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. हा तरुण डहाणू तालुक्यातल्या रामटेकडी इथं राहणारा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अजय वसावे आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी डहाणुहुन कास्याला जाणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं डहाणुत मिशन हॉस्पिटलजवळील बस स्टॉप समोर सापळा रचून हा तरुण अॅक्टीव्हाहुन अंमली पदार्थ घेवुन जात असताना त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 3 किलो गांजा सापडून आला.
ज्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं या तरुणा विरुद्ध डहाणु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आणि आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील हे करत आहेत.