पालघर : जिथे पिकते तिथे विकत नाही अशी जर परिस्थिती असेल तर तिथे अशी प्रदर्शन भरवणं गरजेचं आहे. आणि अशा प्रदर्शनाचं कायम स्वरूपी डॉक्युमेंटेशन पुस्तकाच्या स्वरूपात करणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं मत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ब्रांच सेक्रेटरी अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.
दरवर्षी प्रमाणे यंदा ही जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आरोग्यदायी रानभाज्यांबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशानं गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषि विज्ञान केंद्र आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं डहाणू तालुक्यातल्या कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी रानभाजी महोत्सवाचं आणि रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महोत्सवाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित असताना त्या बोलत होत्या.
या महोत्सवात पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. उत्तम महाडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अशा राणभाज्यांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून राणभाज्यांची एक चळवळ उभी राहिली पाहिजे जेणेकरून आदिवासीं बांधवांना एक उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकेल असं यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके म्हणाले.
या रानभाज्या महोत्सवात जिल्ह्यातल्या विविध भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात अळू, शेवगा, सुरण, कोली भाजी, कंटूले, खरशिंग, करांदा, टेटू, आंबूशी, कोहरेल, काटेरीमाठ, टाकळा, डिनी, लोत, आघाडा यासारख्या विविध रानभाज्यांचे त्यांच्या माहितीसह स्टॉल लावण्यात आले होते. तसचं पाककृती स्पर्धेत महुआ, अळू, सुरण, शेवगा अशा अनेक रानभाज्यांपासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या पाककृती ठेवण्यात आल्या होता. यावेळी या पाककृती स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं.