पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. रक्षाबंधन सणानिमित्त महिला, मुली आपल्या भावासाठी वेगवेगळ्या आकाराच्या, डिझाईनच्या, कोणी सोन्याच्या तर कोणी चांदीच्या राख्या विकत घेत असतात. मात्र गेल्या सात ते आठ वर्षा पासून विरार मधल्या सेवा विवेक या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी महिला बांबू पासून राख्या तयार करून पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदा त्यांनी बांबूच्या राख्यांमध्ये विविध प्रकारच्या बिया टाकुन राख्यांच्या माध्यमातून वृक्ष तयार करून पर्यावरणाचं रक्षण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्या या राख्यांना सध्या भारतातुनचं नव्हे तर परदेशातुन ही मोठी मागणी येत आहे.
सेवा विवेक या संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातल्या बोट या गावातल्या महिलांनी बांबूपासून विविध प्रकारच्या राख्या बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. यंदा या महिलांनी मोठ्या प्रमाणात पूर्णा, शंख, गिरीजा, सुर्या, झेलम, तानसा यासारख्या जवळपास 28 प्रकारच्या बांबूच्या अतिशय सुंदर आणि सुबक अशा राख्या तयार केल्या आहेत. त्यापैकी 50 हजारांहून अधिक राख्यांची यशस्वीरित्या विक्री देखील झाली आहे.
यंदाच्या या बांबूच्या राख्यांचं वैशिष्ट्ये असं की, या राख्या स्वदेशी असून पर्यावरण पूरक आहेत. या राख्या बनवण्यासाठी मानवेल जातीच्या हिरव्या बांबूचा वापर केला जातो. जो जिल्ह्यातल्या आसपासच्या भागांत उपलब्ध आहे. या राख्यांना सजवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आलायं. तसचं यंदाचं याचं नाविन्य असं की, एक राखी, एक वृक्ष ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या महिलांनी या राख्यांमध्ये वड, पिंपळ, शमी, आवळा, बेल, तुळसी, लिंबू या सारख्या देशी वृक्षांच्या बिया टाकल्या आहेत. जेणेकरून जेव्हा कधी या राख्या जिथे पडतील तिथे या राख्यांमधल्या बियांच्या माध्यमातून वृक्ष तयार होऊन पर्यावरणाचं जतन आणि रक्षण होऊ शकेल.
सध्या या राख्यांना केवळ भारतातूनचं नव्हे तर सातासमुद्रापार ओस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, मध्ये ही मागणी आहे. एक महिला एका दिवसांत जवळपास 25 राख्या तयार करते. बाजारात या राख्यांची किंमत प्रत्येकी 30, 35, 40, 50 रूपये याप्रमाणे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं भातशेतीची कामं मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे या महिला दिवसा घरातली आणि शेतीचीकाम करून मग उरलेल्या वेळेत या राख्या बनवण्याचं काम करतात. ज्यातून त्यांना घरबसल्या चांगला रोजगार मिळत आहे.