पालघर : पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. तद्वतच डोंगर, नद्या, झरे, तळी, घनदाट वनराई आणि जैविक विविधतेने हा जिल्हा नटला आहे. येथील वनराई आणि शेतामधून विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळून येतात. पानभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या अशा विविध प्रकारची वनस्पतीजन्य विविधता प्रचुर प्रमाणात पसरली आहे. आपल्या परिसरातील या सर्व रानभाज्यांचा परिचय पालघर शहरातील नागरिक, महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना व्हावा या उद्देशाने भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे ( आझादी का अमृत महोत्सव ) व हर घर तिरंगा या राष्ट्रीय अभियानाचे औचित्य साधून दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने हा “रानमेवा मेळावा” आयोजित केला होता.
नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रानभाज्यांची ओळख करून देऊन त्या वनस्पतींचे आहारातील महत्व, त्यांचे औषधी गुणधर्म समजावून सांगणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. महाविद्यालयात औषधी वनस्पती उद्यान अनेक वर्षापासून कार्यरत आहे. यात जवळपास २५० विविध प्रकारची औषधी वनस्पतीची झाडे लावलेली आहेत. सदर उद्यान पाहण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी मुंबई नामांकित रुपारेल महाविद्यालय, विज्ञान संस्था, भवन्स कॉलेज, बांदोडकर कॉलेज, बी.एन. एन. कॉलेज भिवंडी या सारख्या महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी भेट देत असतात.
या मेळाव्यासाठी विभागप्रमुख प्रा. भगवान जयस्वाल आणि त्यांचे सहकारी तसेच करहे, विक्रमगड गावचे माजी सरपंच जगन्नाथ हिलीम, त्यांच्या २० आदिवासी बांधवानी या मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले. या रानभाज्या मेळाव्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे आणि संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या मेळाव्यात आदिवासी बांधवानी ७५ रानभाज्या ठेवल्या होत्या. त्यासोबतच भाकरी आणि रानभाज्यांपासून तयार भाज्यांचा आस्वाद अनेक उपस्थितांनी घेतला. याशिवाय उपस्थितांनी अनेक रानभाज्यांची खरेदी केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ, प्रा. महेश देशमुख यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी परिसरातील वृक्षमित्र प्रकाश काळे, साठे कॉलेज, विलेपार्ले, मुंबई चे प्राध्यापक – विद्यार्थी उपस्थित होते.
आदिवासी बांधवानी आणलेल्या रानभाज्यामध्ये प्रामुख्याने डोंगरजीरा, टेटूचे फुल, टेटवाची शेंग, रिंडा, सरबल, तेरडा, कोसिम्ब, अंबाडा – उरंदीचे लोणचे अशा अत्यंत दुर्मिळ वनभाज्यांचे स्टॉल लावल्यामुळे त्यांनाही काही प्रमाणात यानिमित्ताने अर्थाजन झाले. आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थाना ज्ञानार्जनही झाले. हा मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा. भगवान जयस्वाल, प्रा. अस्मिता राऊत, प्रा. दक्षता पाटील, प्रा. रुद्राक्षी राऊत, डॉ. विराज चाबके, प्रा. राहुल ओझरे, प्रा. हर्षल चौधरी, प्रा. तेजस चौधरी, प्रा. कल्याणी जोशी, प्रा. प्रतीक्षा बोरसे, प्रा. सुधीर शर्मा, शिक्षकेत्तर कर्मचारी निखिल भट, हरेश्वर राऊत, सुरेश नम, भावेश दुबळा, यांनी प्रयत्न केले.