पालघर : विद्यार्थ्यांची भावनिक जडणघडण योग्य प्रकारे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा महत्वपूर्ण “प्रज्ञा परिसर प्रकल्प” सोनोपंत दांडेकर महाविद्यालय कार्यान्वित करण्यात आला आहे. बदलत्या आणि गतिमान काळातील भावना व्यवस्थापनाचे महत्व लक्षात घेऊन महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना भावनांचे योग्य व्यवस्थापन, सुसमायोजन करण्याचे प्रशिक्षण देणे आणि त्याद्वारे emotion friendly कॅम्पस निर्माण करणे हा प्रज्ञा परिसर प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून ३६ महाविद्यालयांची निवड केली आहे. पालघर जिल्ह्यातून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. हे महाविद्यालय पालघर जिल्ह्यातील अन्य महाविद्यालयांना यासंदर्भात प्रशिक्षित करणार आहे. हे प्रशिक्षण जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यार्थी अशा व्यापक स्तरावर देण्यात येणार आहे .
१ ते ५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) या अंतर्गत महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडेमी (MSFDA) आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH) यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्रज्ञा परिसर प्रकल्प प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातर्फे डॉ. मनीष देशमुख, सहा. प्रा. कॅप्टन अनघा पाध्ये-देशमुख, सहा. प्रा. कल्याणी जोशी, सहा. प्रा. निधी माळी, राष्ट्रीय छात्र सेना छात्रा युगा चुरी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मुन्ना जैस्वाल हे सहभागी होवून त्यांनी सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.
पाच दिवसांच्या या कार्यशाळेत विख्यात मनोविकारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभागी महाविद्यालयांना भावनांचे, मनाचे घटक कोणते, मानसिक आरोग्य म्हणजे काय, ते कसे जोपासावे, भावनांचे सुसमायोजन कसे करावे, Rational Emotive Behavioural Therapy कशी वापरावी, कृती-श्रद्धा-परिणाम तसेच भावना-वर्तन यांच्यात समतोल कसा साधावा यासारख्या अनेक महत्वाच्या संकल्पना, पैलू व्याख्याने, चर्चा, आंतरक्रिया, गटांतर्गत उपक्रम, समाजातील आदर्शांच्या प्रत्यक्ष मुलाखती याद्वारा उलगडून, स्पष्ट करून दाखविल्या. या सर्वांचा उपयोग करून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने प्रज्ञा परिसर प्रकल्पाचा भविष्यकालीन आराखडा (blue print) शेवटच्या दिवशी सादर केला.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्यामध्ये विविध कोर्सेससाठी सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार असल्याची आणि त्यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी दिली. या महत्त्वपूर्ण उपक्रमासंदर्भात समन्वय साधण्याचे काम महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महेश देशमुख, डॉ. तानाजी पोळ करीत आहेत.