पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. त्यामुळे याच रक्षाबंधन सणानिमित्त पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी बनाना फायबर पासून सुंदर आणि सुबक अशा तिरंगा राख्या तयार केल्या आहे. ज्यांना मुंबईसह विविध ठिकाणांहुन मोठी मागणी येत आहे.
यंदाचं वर्ष हे अमृत महोत्सवी वर्ष असल्यानं आजादी का अमृत महोत्सवाचं औचित्य साधून आपल्या कल्पनेतुन पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्या मधल्या तुसे या गावात राहणा-या महिलांनी यंदा बनाना फायबरपासून अतिशय बारीक़ काम करून सुंदर अशा तिरंगा राख्या तयार केल्या आहेत. तुसे गावातल्या समर्थ ग्रामसंघा अंतर्गत उमेद अभियानातून स्थापन झालेल्या महिला बचत गटातल्या 20 महिलांच्या उत्पादक गटानं यंदा बनाना फायबर पासून तिरंगा राखी बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा बहीण भावाच्या नात्याचं पवित्र बंधन तिरंग्याच्या रंगात बांधण्यासाठी अतिशय कल्पकतेनं या राख्या बनवण्यात आल्या आहेत. केशवसृष्टी या संस्थेच्या माध्यमातुन या महिलांना आतापर्यंत 70 हजार राख्यांची ऑर्डर मिळाली आहे.
भारत देशाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगात पालघर जिल्ह्यातल्या या ग्रामीण महिलांनी केळीच्या खोडापासून अतिशय सुंदर अशा या पर्यावरण पूरक तिरंगा राख्या तयार केल्या आहेत. ज्या आता केशवसृष्टी या संस्थेच्या माध्यमातुन वेगवेगळ्या भागांत देशाचं रक्षण करणा-या सैनिकांपर्यंत पोहचल्या आहेत. आणि लवकरचं या बनाना फायबरच्या तिरंगा राख्या भारतीय सैनिकांच्या हातावर झळकतील. आणि याचा या महिलांना सार्थ अभिमान वाटत आहे.
ही एक राखी बनवण्यासाठी जवळपास 50 रुपयांपर्यंतचा खर्च येतो. मुंबईच्या बाजार पेठेतही या पर्यावरण पूरक राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. केळीच्या खोडापासून रॉ मटेरियल तयार करून मग या महिला या राख्यांना तिरंग्याच्या रंगातात. आणि त्याना वेगवेगळ्या आकारात तयार करतात. आपल्या घरातील सर्व कामं करून, शेतीची कामं आटपून उरलेल्या वेळेत या महिला एकत्र येवून या राख्या तयार करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलां घरबसल्या चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.