पालघर : राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन‘. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावानं आपलं रक्षण करावं ही यामागची मंगल मनोकामना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. श्रावणात येणारा रक्षाबंधन हा सण भारताच्या अनेक भागांमध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. हा सण आता जवळ येऊ लागल्यानं सर्वच बहिणींची पावलं राख्या घेण्यासाठी बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. अशातच पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या टेटवाली गावातला टेटवाली बांबू हस्तकला स्वयंम सहाय्यता महिला समूह हा सध्या दिवस रात्र काम करून अतिशय सुबक आणि अतिशय बारीक काम, रंगसंगती आणि नक्षीकाम असलेल्या बाबूंच्या राख्या बनवण्यात व्यस्त आहे.
टेटवाली बांबू हस्तकला स्वयं सहाय्यता महिला समूहात सध्या बाबूंपासून हातानं अतिशय बारीक नक्षीकाम केलेल्या सुंदर अशा विविध प्रकारच्या राख्या बनवण्याचं काम सुरू आहे. या बांबूपासून तयार केलेल्या राख्यांना मुंबई शहरासह इतर राज्यांत देखील मोठी मागणी आहे.
केशव सृष्टी या संस्थेकडून टेटवाली बांबू हस्तकला स्वयं सहाय्यता महिला समूहानं बाबूंपासून विविध कलाकृती तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. आणि आता याच केशव सृष्टी संस्थेच्या माध्यमातून या महिला समूहाला जवळपास 25 हजार बाबूंच्या राख्या बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. विक्रमगड मधल्या टेटवाली, माडाचापाडा, चिंचपाडा, खुडेद, वाकी, गरदवाडी या सहा गावांमधल्या महिलांना मिळून ही ऑर्डर मिळाली आहे.
यासाठी लागणारा बांबू हा जिल्ह्यातल्या जवळपासच्या भागातून आणला जातो. या राख्या बुलेट ( आसामी ) जातीच्या बांबूपासून तयार करण्यात आल्या आहेत. आणि या राख्या पॅक करण्यासाठी जे बॉक्स तयार करण्यात आले आहेत त्यासाठी मेस जातीच्या बांबूचा वापर करण्यात आला आहे. तसचं या राख्या सुंदर आणि चमकदार दिसाव्यात यासाठी टच वुड वोर्निशचा वापर करण्यात आला आहे. बाजारात एका बॉक्स मध्ये प्रत्येकी दोन राख्या या प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध असून या दोन राख्यांची पॅकिंग सहित किंमत ही 50 रूपये इतकी आहे.
टेटवाली बांबू हस्तकला स्वयं सहाय्यता महिला समूहाची 45 जणांची टीम आणि इतर पाच गावातल्या महिलांची टीम ही ऑर्डर पूर्ण करण्याचं काम करत आहे. त्यांचं हे काम जवळजवळ पूर्ण झालं असून राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सध्या पावसाळयाचे दिवस असल्यानं सर्वत्र भातशेतीची काम सुरु आहेत. त्यामुळे दिवसा या महिला शेतीची काम पूर्ण करून रात्रीला आराम करण्याच्या वेळेत एकत्र येवून रात्र-रात्र भर जागुन अतिशय मेहनतीनं या राख्या तयार करण्याचं काम करतायेत. रक्षाबंधन सण तोंडावर आल्यानं या बांबूच्या राख्यांना मोठी मागणी असल्यानं या महिलांना एक चांगला रोजगार सुद्धा मिळतोय. त्यामुळे या माध्यमातून आदिवासी समाजाच्या महिलांचं जीवनमान आता हळूहळू सुधारु लागलं आहे.