पालघर : पालघर जिल्ह्यातले समुद्र किनारे स्वच्छ रहावेत आणि त्या माध्यमातून इथल्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशानं पालघर जिल्ह्यातल्या केळवे या सुप्रसिद्ध समुद्र किना-यावर आता स्वच्छतेसाठी मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून 90 लाख रूपये इतक्या किंमतीची बीच क्लिनिंग मशीन ( Beach Cleaning Machine ) जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केळवे समुद्र किना-यावर ( Kelve Beach ) देण्यात आली आहे. या मशीनचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी माणिक गुरसळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते केळवे बीचवर पार पडला.
पालघर जिल्ह्याला समुद्र किना-यांचं वैभवचं लाभलं आहे. मात्र या समुद्र किना-यांवर पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा कचरा खासकरून प्लास्टिक युक्त कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे हे सुंदर असे समुद्रकिनारे अस्वच्छ होवून परिणामस्वरूप इथल्या पर्यटन व्यवसायाला याचा फटका बसत आहे.
पहा व्हिडिओ ……..
एवढे मोठे समुद्र किनारे कचरा उचलून स्वच्छ करण्यासाठी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ आणि वेळ ही लागतो. यावर पर्यायी मार्ग म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं 90 लाखांची बॉबकैट ( Bobcat ) या कंपनीची बीच क्लिनिंग मशीन समुद्रकिना-यावरील कचरा कमीतकमी वेळात स्वच्छ करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.
या मशीनच्या माध्यमातून आता अवघ्या दोन तासांत केळवे बीचवरील कचरा साफ़ होवू शकेल. आणि मनुष्यबळाची देखील गरज भासणार नाही. पुढील तीन वर्ष या बीच क्लिनिंग मशीनची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी ही प्रदूषण नियंत्रण मंडळाकड़े असणार आहे.
आता मशीनच्या माध्यमातून वेळोवेळी या समुद्रकिना-याची स्वछता राखली जाईल त्यामुळे असे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना आपल्याकड़े आकर्षित करू शकतील. जेणेकरून इकडे पर्यटकांची संख्या वाढून या भागातल्या पर्यटन व्यवसायाला अधिक चलना मिळू शकेल असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला.