पालघर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात 75 दिवसांसाठी कोविड लस अमृत महोत्सव राबवण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात कोविड लस अमृत महोत्सवा अंतर्गत पात्र लाभार्थ्याना कोरोना प्रतिबंधात्मक मात्रा ( Precaution Dose ) देण्याच्या विशेष मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते शुक्रवारी पालघर जिल्ह्यातल्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला.
कोरोना अजून पूर्णपणे आटोक्यात आला नसून मोफत कोरोना प्रतिबंधक मोफत बूस्टर लस प्रत्येकाने टोचून घ्यावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा असं आवाहन यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नागरिकांना केलं.
यावेळी दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ वर्षांवरील पात्र नागरिकांना ( Precaution Dose, 30 जणांना कोव्हीशिल्ड आणि 20 जणांना कोवॅक्सिन या लसी देण्यात आल्या. कोविड लस अमृत महोत्सव मोहिमे अंतर्गत १५ जुलै पासून येणाऱ्या ७५ दिवसांपर्यंत नागरिकांना मोफत कोरोना लसीची प्रतिबंधात्मक मात्रा ( Precaution Dose ) देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण, दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, गट प्रवर्तक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.