पालघर : मुंबई – वडोदरा एक्सप्रेसवे काम करणा-या जीआर इन्फ्रास्ट्रक्चर प्राईवेट लिमिटेट या कंपनीच्या इंजिनीअर आणि मॅनेजर विरुद्ध मजुरांच्या जीवितास धोका निर्माण केल्यामुळे कलम 188, 336, 34 नुसार मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्यानं ही जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला होता. अति पर्जन्यवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगानं धोक्याच्या ठिकाणी जावू नये आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं होतं. मात्र तरी देखील मुंबई – वडोदरा एक्सप्रेसवे काम करणा-या जीआर इन्फ्रास्ट्रक्चर प्राईवेट लिमिटेट या कंपनीच्या इंजिनीअर आणि मॅनेजर नं 10 मजुरांच्याया जीवाशी खेळत त्यांना वैतरणा नदीत सुरू असलेल्या पुलाच्या कामासाठी पाठवलं. अति पर्जन्यवृष्टीमुळे वैतरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.आणि हे 10 कामगार अन्न पाण्याशिवाय 2 दिवस आपला जीव मुठीत घेऊन नदीच्या पुराच्या पाण्यात बार्जवर अडकून राहिले.ज्यांना गुरुवारी सकाळी एनडीआरएफ च्या टीमनं सुखरूप बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवलं.
या 10 कामगारांच्या जीवितास धोका निर्माण केल्यामुळे जीआर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या मॅनेजर नवीन श्रीवास्तव आणि इंजिनियर अनिल तरे यांच्या विरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.