पालघर : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयानं जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात आणि देशभक्तीची भावना कायम स्वरूपी मनात राहावी, त्याचं स्मरण व्हावं या उद्देशानं “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत देशभरात “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यात देखील हा उपक्रम जिल्हा परिषदे मार्फत यशस्वीपणे राबवला जाणार आहे.
त्या अनुषंगाने आज पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात २ ग्रामसेवक संघटना, २ लिपिक वर्गीय संघटना, ४ आरोग्य कर्मचारी, १ लेखा कर्मचारी संघटना, १ विस्तार अधिकारी संघटना, २ वाहनचालक आणि १ शिपाई संघटना आदी संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात ४.५ लाख कुटुंबे असून प्रत्येक घरावर तिरंगा फडकवणे, सोबत प्रत्येक शासकीय कार्यालयांवर देखील झेंडा फडकावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत योग्य ते प्रयन्त करण्यात येतील असं मत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले.
प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात ३० रूपये प्रमाणे तिरंगा झेंडा विक्रीसाठी ठेवण्यात येईल. नागरिकांनी हा झेंडा स्वतः खरेदी करावयाचा आहे. तसचं जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी आणि या संघटना यांच्यामार्फत ४०,००० झेंडे देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. समाजातील दुर्बल घटकांसाठी हे देणगी स्वरूपातील झेंडे ग्रामपंचायती मध्ये उपलब्ध असतील.
या सात दिवसात झेंड्याची कुठल्याही प्रकारची अवहेलना होणार नाही याची काळजी घेण्याबद्दल जनजागृती करण्यात यावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बैठकी दरम्यान दिले.