मुंबई, दि. 29 : कोरोना संकटाच्या कालावधीत मनामनावर दाटलेले मळभ शरद पौर्णिमेच्या कालावधीतील शारदीय चांदण्यांच्या स्पर्शाने दूर करत मंत्रालयात ‘शतदा प्रेम करावे’ हा काव्य वाचनाचा कार्यक्रम रंगला.
मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी कल्याण समितीच्या वतीने मंत्रालयात परिषद सभागृह येथे या काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोना संकटात दिसलेले भाव-भावनांचे विश्व, मानवी मनाचे कंगोरे, ताणतणाव आणि आनंदाचे क्षण यावर आधारीत जगण्यावर प्रेम करायला शिकविणाऱ्या कवितांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या काव्यवाचनाचा उद्देश फक्त मनोरंजनाकरीता नव्हता तर कोरोना काळात सर्वांच्याच मनावर आलेले मळभ दूर करणे हा होता.
अजय भोसले, अंजली मोटळकर, मच्छिंद्र डवले, स्वप्ना चव्हाण, मिनल जोगळेकर, यांच्यासह श्री. विवेक दहीफळे, मंगल नाखवा, स्वाती महांगरे, दिवाकर मोहिते, रवींद्र पानसरे, प्रवीण मुंडे, सतीश जोंधळे, प्रशांत साजणीकर, जयश्री सिंगलवार, सचिन देवडराव, अमोल उगलमले, संजय जाधव, अतुल कुलकर्णी, सतीश मोघे, अभय जावळे या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कविता यावेळी सादर केल्या. मनाला उभारी देण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाले. अशा भावना कवी व कवयित्री यांनी व्यक्त केल्या.
मंत्रालय उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांचा सत्कार
लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोनासारख्या महामारीशी संघर्ष करीत असताना मंत्रालयातील उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता, गरम पाणी तसेच आवश्यकतेनुसार जेवणाची सोय करणे अशी कामे नियमितपणे व आपुलकीने पार पाडली. त्यानिमित्त मंत्रालय उपाहारगृहाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र अंबिलपुरे तसेच उपाहारगृहाचे कर्मचारी परशुराम सितप, संदिप चिकणे, भरत वाजे, पद्माकर परवडी, श्रीधर यरगट्टीकर व शिवाजी आव्हाड यांचा गुलाब पुष्प, शर्ट, मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव श्री. सतीश जोंधळे म्हणाले, मंत्रालयीन उपहारगृहातील कर्मचाऱ्यांच्या वेदना, समस्या अनुभवल्या आहेत. सकाळी 4.30 वाजेपासून ते मंत्रालयात उपस्थित राहून जीव ओतून काम करीत असतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी तीन ते चार महिने घरी न जाता मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा पुरविल्या. त्यांचा हा सत्कार कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल कोरोना योद्धा म्हणून केल्या जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी वित्त विभागाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी कवयित्री स्वप्ना चव्हाण यांनी एप्रिल 2020 चे पूर्ण वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिल्याबद्दल त्यांचा वित्त विभागाचे सहसचिव श्री.दहिफळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गृहनिर्माण विभागाचे उपसचिव श्री.धनावडे, नगरविकास विभागाचे उपसचिव श्री. विजय चौधरी, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा.ना. मुसळे, जलसंपदा विभागाचे अवर सचिव श्रीमती सुशिला पवार तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम आयोजनात श्री.विशाल जोंधळे, देवदत्त राऊत, अश्विनी लांभाते व भरत लब्दे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा नातू यांनी केले.