पालघर : पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी आणि मुरबे खाडीच्या किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने मृत माश्यांचा खच दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तारापूर एमआयडीसी मधून सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे या माश्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार समुदायाकडून करण्यात येत आहेत.
मुरबे खाडीमधील पाण्यावर बोई प्रजातीचे मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत असल्याचं काही ग्रामस्थांच्या लक्षात आलं. काही काळानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या मृत माशांची संख्या वाढून लागली. त्यानंतर तरंगणारे मासे पाहण्यासाठी ग्रामस्थ समुद्रकिनारी आले. मृत माश्यांची वाढती संख्या पाहता स्थानिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यानी घटनास्थळी पोहचून खाडीतील पाण्याचे नमुने गोळा केले. आणि ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
याविषयी तारापूर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी माहिती देताना सांगितलं कि,या घटनेनंतर आम्ही त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. आणि ते नुमुने तपासणीसाठी लॅब मध्ये पाठवण्यात आले आहेत. यासाठी किमान आठ दिवसांचा कालवधी लागू शकेल. मृत माश्यांचे नमुने घेण हे फिशरी डिपार्टमेंटचं काम आहे.
स्थानिक मच्छिमार महेंद्र आरेकर यांनी माहिती देताना सांगितलं कि, तारापूर एमआयडीसी मध्ये असलेल्या कंपन्यामधून निघणाऱ्या केमिकलयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी समुद्रांमध्ये, खाड्यांमध्ये, नदी नाल्यां मध्ये सोडलं जात. त्यामुळेच मस्त्य संपदेला हानी पोहचत आहे.