पालघर जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताहाचं आयोजन
पालघर : पालघर जिल्ह्यात ११ ते १७ डिसेंबर या काळात सिकलसेल जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात 2009 पासून जवळपास 13,96,353 इतक्या सिकलसेलच्या तपासण्या करणात आल्या आहेत. त्यात 24 हजार 228 वाहक आणि 1 हजार 606 सिकलसेल ने ग्रसित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोफत औषधोपचार, रक्त पुरवठा, समुपदेशन करण्यात येत आहे. दरम्यान या रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आर्थिक लाभ सुद्धा देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
याविषयी माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी सांगितलं की, सिकलसेल आजार हा अनुवांशिक असून आई-वडिलापासून अपत्यांना होत असतो. रक्त पेशिंशी संबधित असलेला हा आजार आहे. सिकलसेल च्या रक्त पेशी या विळ्याच्या आकाराच्या आणि ताठर असतात. या पेशी रक्त वाहिन्यांना चिटकून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होवून त्या भागातला रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परीस्थितीत रुग्णाला असह्य वेदना होतात. सिकलसेल रुग्णांच्या हाडांवर महत्वाचं म्हणजे डोळे, सादुपिंड,त्वचा, पित्ताशय आदींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. जर या आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर सिकलसेल वाहकांनी तसचं सिकलसेल ग्रस्त रुग्णांनी आपापसात कधी ही विवाह करू नये. कारण असं केल्यानं होणारं अपत्य हे सिकलसेल वाहक किंवा रुग्ण म्हणून जन्माला येते. सिकलसेल आजारावर संपूर्ण उपचार नाही. मात्र, यावर नियंत्रण मिळवनं शक्य आहे. सिकलसेल रुग्णाने नियमित आणि समतोल आहार घेणे आवश्यक आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं सिकलसेल च्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आपली सिकलसेल रक्ताची तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष चौधरी यांनी केलं आहे.
सिकलसेल अजाराची लक्षणे :
रक्तातील होमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.
हातापायावर सूज येणे, भूक मंदावणे
सांधे दुखणे,असह्य होणे,
लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे
लहान बालकांना वारवार जंतू संसर्ग होणे
शरीर पिवळसर होणे
सिकलसेल रुग्णांना मिळणारा लाभ :
सिकलसेल रुग्णाला मोफत औषधोपचार, रक्त पुरवठा, समुपदेशन आदी सुविधा देण्यात येतात. तसचं सिकलसेल रुग्णाला संजय गांधी निराधार योजने अंतर्गत आर्थिक लाभ दिला जातो. दहावी आणि बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्येक पेपरला २० मिनिटांचा अधिक वेळ दिला जातो. सिकलसेल रुग्णांना बस प्रवासात सवलत दिली जाते.