पालघर : पालघर जिल्ह्यातले शेतकरी हे नेहमीच शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत असतात. मग ते शहरी भागातले असोत किंवा ग्रामीण भागातले. पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्या सारख्या अतिदुर्गम भागातले अनेक शेतकरी उपवासाला विशेष असं महत्व असलेल्या भगरचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. मोखाड्या तालुक्यातल्या तुळ्याच्या पाड्यातल्या 100 पेक्षा अधिक शेतक-यांनी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात भगरचं उत्पादन घेतलं आहे. ज्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळते.
उपवास, व्रत, वैकल्याचे दिवस येताच आपल्याला आठवण होते ती म्हणजे उपवासासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची. त्यात प्रामुख्याने आपल्याला आठवतं ते म्हणजे साबुदाणा आणि भगर. आणि त्यापासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थ. उपवासासाठी भगर आणि त्यापासून तयार केलेले विविध पदार्थ हमखास खाल्ले जातात. त्यामुळे बाजारात भगर ला चांगली मागणी आहे. भगरला असलेली मागणी लक्षात घेत पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा अशा अतिदुर्गम भागातले अनेक शेतकरी आपल्या भगरचं उत्पादन घेतात. यंदा मोखाडा तालुक्यातल्या तुळ्याचा पाडा या गावातल्या 100 पेक्षा हि अधिक शेतकर्यांनी आपल्या शेतात भगरचं उत्पादन घेतलं आहे. ज्यातून त्यांना चांगला आणि त्वरित आर्थिक नफा मिळत आहे.
वरई या पिकालाचं चिना, वरई, वरी, भगर अशा विविध नावांनी संबोधलं जात. हे कमी दिवसांत लवकर वाढ होणारं असं पीक आहे. तृणधान्य वर्गात मोडणारं हे पीक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. वरई या तृणधान्यावर प्रक्रिया करून त्यापासून भगर तयार होते. याला इंग्रजीत स्मॉल मिलेट असं म्हटलं जात. भगर पासून भात, पुऱ्या, भाकरी, थालपिठ यासारखे उपवासाचे अन्नपदार्थ बनवले जातात. हे धान्य वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते. आरोग्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे उर्जास्रोत आहे. यात सर्वात जास्त लोह आणि डाएट्री फायबर असून कारबोहायड्रेट्सचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे हा एक उत्कृष्ट तांदूळ मानला जातो. हे एक कमी ग्लायसेमीक इंडेक्स असलेलं अन्न आहे. ज्यामुळे वजन आणि रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. वरई भगर सर्वांत उच्च प्रतीची असल्यानं तिला बाजारभाव ही चांगला मिळतो.
जिल्ह्यातल्या मोखाड्या सारख्या डोंगराळ भागात राहणारे आदिवासी समुदायाचे शेतकरी नियमित पणे पारंपारिक पद्धतीने भगरचं उत्पादन घेतात. जुलै महिन्यात वरई म्हणजेच भगरची पेरणी केली जाते. साधारण: चार महिन्याचं हे पिक असून नोव्हेंबर महिन्यात या पिकाची काढणी केली जाते. मोखाड्या मधले शेतकरी प्रामुख्याने घोशिवरी आणि दूध मोगरा या दोन प्रकारच्या जातींच्या वरईची लागवड करतात. तयार झालेली वरई शेतकऱ्यांच्या शेतातून व्यापाऱ्यांच्या माधमातून बाजारपेठेत पोहचते. त्यावर प्रक्रिया करून भगर तयार केली जाते. या भगर पिका बरोबरच इथले शेतकरी नागली, भात, उडीद, तुर यासारखी जोड पिकं देखील घेतात.
इथल्या शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी बाहेर जाण्याची सहजासहजी आवश्यकता भासत नाही. व्यापाऱ्यांकडून सध्या ४३ रुपये किलो प्रमाणे या धान्याची खरेदी केली जात असून बाजारात मात्र हि भगर ५० रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकली जाते. पिक तयार झाल्यानंतर व्यापारी स्वतः या शेतकऱ्यांकडे येवून हे धान्य खरेदी करत करतात. त्यामुळे इथले शेतकरी या पिकाला कॅश पिक असं म्हणतात. ज्या वर्षी कोणाच्या घरी लग्न सोहळा होणार असेल त्या वर्षी ते शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात भगरचं उत्पादन घेतात जेणेकरून या पिकाच्या माध्यमातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळून शकेल असं इथले शेतकरी सांगतात.
असं पौष्टिक गुणधर्म असलेलं आणि चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवून देणारं वरई ची पिक या मोखाडा भागातल्या शेतकऱ्यांसाठी कॅश पिक स्वरुपात वरदान ठरलं आहे.