पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या खोमारपाडा या गावात रोजगार हमी योजेअंतर्गत मोठ्या प्रमाणात झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, खोमारपाडा या गावाची पूर्वीची वाटचाल आणि आताची वाटचाल ही वेगळी आहे. पूर्वी गावची लोकं कामासाठी गावाबाहेर स्थलांतरित होत होती. मात्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातल्या नागरीकांना गावातच रोजगार मिळाल्यानं आता गावातली परिस्थिती बदलली आहे. इथली लोकं मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात पालघर जिल्ह्यातलं आदिवासी नागरिकांचं खोमारपाडा हे गाव आता मॉडेल गाव ठरलं आहे असं मंत्री गोगावले म्हणाले.
आमच्या खात्याच्या जवळजवळ सर्व योजना या गावात राबवण्यात आल्या आहेत. आणि त्या माध्यमातून हे गाव आता मॉडेल गाव म्हणून नावारूपास आलं आहे. गावाच्या समृध्दीसाठी आवश्यक त्या योजना अगोदर आम्ही राबवू असं आश्वासन ही त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिलं. पालघर जिल्ह्यात विविध योजनांचा निधी का येवू शकलेला नाही, निधीचे पैसे का अडकले आहेत या बाबतीत आम्ही अभ्यास करू असं ही ते म्हणाले.
या खात्याचं मंत्री पद मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी पहिल्यांदा पालघर जिल्ह्याचा दौरा करत खोमारपाडा गावातील मोगरा शेती, कुकुट पालन, शेळी पालन, मस्त्यपालन करत असलेल्या यशस्वी शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला.