पालघर : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात सुरक्षितेच्या दृष्टीनं जिल्ह्यातल्या सर्व आश्रमशाळा बंद आहेत. आश्रमशाळा सुरु करणं आव्हानात्मक असल्यामुळे नाशिकचे आदिवासी विकास आयुक्त यांच्याकडून जून मध्ये मिळालेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांचं अनलॉक लर्निग सुर ठेवण्याचा उपक्रम राबवण्याचे निर्देश आहेत.
पालघर जिल्हा आदिवासी बहुल असुन डहाणूच्या प्रकल्प कार्यालयाचं काही कार्यक्षेत्र अतिदुर्गम असल्यानं विद्यार्थ्यांना आश्रमशाळेपर्यंत आणण्या ऐवजी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शाळा बंद पण शिक्षण आपल्या दारी अनलॉक लर्निंग हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचं डहाणूच्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितलं.
गाव-पाड्यावरती आश्रमशाळेतले शिक्षक आणि शिक्षेत्तर कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडतायेत. आश्रमशाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्याचं मानसिक, सामाजिक, आरोग्य बिघडू नये यासाठी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचंवण आवश्यक आहे. अन्यथा त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रक्रिया खंडीत होवून अनुसूचित जमातीचे विद्यार्थी इतर समाजातल्या विद्यार्थ्यंपेक्षा मागे पडण्याची शक्यता असल्यानं हा प्रकल्प राबिण्यात येत असल्याची माहिती आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.
सर्वप्रथम इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंत तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीनं विषय निहाय नावीन्यपूर्ण व्हींडिओ , ऑडिओ यांचं संकलन करून ते प्रत्येक शाळेमध्ये पोहोच करण्यात आलं. जेणेकरून शिक्षक आपल्याकडील मोबाईल, लॅपटॉप, संगणका सारख्या साधनांचा वापर करून मुलांना मनोरंजनात्मक शिक्षण उपलब्ध करून देत आहेत.
यात प्रकल्प कार्यालयाअंतर्गत कार्यरत 55 अनुदानित आणि शासकिय आश्रमशाळा मधले अंदाजित 29 हजार विद्यार्थी जोडले गेले आहेत. यात प्रत्येक शिक्षकांनी गाव-पाडे विभागुन घेतले असल्यानं कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा स्नेहबंध निर्माण झाल्याचं दिसुन येतं. शिक्षकांना ही आपल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांची कौटोंबिक पार्श्वभूमी कशी आहे हे माहीत असल्यानं शिक्षक ही अतिशय आनंदानं या उपक्रमात सहभाग नोंदवत आहेत.
शाळा कधी सुरु होतील याचा विचार न करता विद्यार्थी आणि शिक्षण यात खंड पडू नये आणि दुर्गम भागातले विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासुन दुर जाऊ नयेत यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशिर असल्याचं मत आशिमा मित्तल यांनी व्यक्त केलं.