पालघर रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्यांसाठी मागणी
पालघर : पालघर जिल्हा हे मुख्यालय असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि औद्योगिक विकास होत आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदर आणि विमानतळ प्रकल्प जाहीर केले आहेत. तसेच तारापूर MIDC हे देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात सुरू असते. आणि पालघर जिल्ह्यात येत असलेल्या नवनवीन प्रोजेक्ट मुळे येणाऱ्या काळात पुढे ती आणखीन वाढेल. अशात पालघर बोईसर या सारख्या महत्वाच्या ठिकाणी रेल्वे स्थानकावर अनेक ट्रेन ना थांबा देणे आवश्यक आहे. त्यामुळे पालघर रेल्वे स्थानकावर काही महत्वाच्या गाड्यांना थांबे देण्यात यावेत याबाबतची मागणी पालघर चे खासदार डॉ हेमंत सवरा यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्यांसाठी मागणी :
जिल्हा मुख्यालय असूनही गेल्या 7 ते 8 वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे पालघर स्थानकावर मंजूर झालेले नाहीत. प्रवाशांची वाढती संख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता गाड्यांचे थांबे देणे आवश्यक आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत पत्रांनुसार (Ref. No. T-425/2/18 (B-50) दिनांक 27.02.2024 व G/160/Misc/2024/69 दिनांक 08.08.2024), रेल्वे मंडळाने या थांब्यांची शक्यता मान्य केली आहे.
त्यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे :
22955/56 – कच्छ एक्सप्रेस
12489/90 – दादर बिकानेर एक्सप्रेस
12935/36 – बांद्रा-सूरत इंटरसिटी एक्सप्रेस
20941/42 – बांद्रा-गाझीपूर एक्सप्रेस
या गाड्यांचे थांबे तातडीने पालघर स्थानकावर मंजूर करण्यात यावेत अशी मागणी खासदार डॉ हेमंत सवरा यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे केली आहे. कारण या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकेल आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना देखील मिळू शकेल.
स्थानिक रेल्वे सेवा विस्तारासाठी महत्त्वाच्या मागण्या :
डहाणू-दादर नवीन लोकल गाडी सुरू करावी :
सध्याच्या लोकल गाड्या प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांसाठी असुविधाजनक ठरत आहेत. त्यामुळे संध्याकाळी 6:15 ते 6:30 दरम्यान डहाणू ते दादर नवीन लोकल सुरू करावी.
अंधेरी-विरार संध्याकाळी सामान्य लोकल गाडी सुरू करावी :
वसई-विरार परिसर झपाट्याने विकसित होत आहे, त्यामुळे प्रवाशांसाठी नवीन लोकल आवश्यक आहे. सायंकाळी 5:25 वाजता अंधेरी ते विरार सामान्य लोकल सुरू करावी.
पहाटे 4:00 वाजता डहाणू-चर्चगेट नवीन लोकल सुरू करावी :
पूर्वी दुध विक्रेते, भाजीपाला व फुलांचे विक्रेते लोकशक्ती एक्स्प्रेसने सफाळा स्थानकाहून दादर बाजारात जात असत. सध्या पर्यायी सुविधा नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे डहाणू-चर्चगेट पहाटे 4:00 वाजता लोकल सुरू करावी.
विरार-डहाणू लोकल प्रकल्पाचा विस्तार करावा :
विरार-डहाणू लोकलचे घोलवड, उमरगाव किंवा भिलाडपर्यंत विस्तारीकरण करावे. डहाणू येथे संपणाऱ्या MEMU ट्रेन भिलाडपर्यंत वाढवाव्यात. सर्व जलद गाड्या (फास्ट ट्रेन) डहाणूऐवजी वापीपर्यंत वाढवाव्यात.
नवीन लोकल मार्ग दिवा-भिवंडी-अनगाव-अंबाडी-कुडूस-वाडा-विक्रमगड :
भिवंडी आणि वाडा हे मोठे औद्योगिक केंद्र बनत आहेत. या नव्या लोकल मार्गामुळे वाहतूक सुलभ होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि मुंबईतील गर्दी कमी होईल.
प्रतिक्रिया :
विकासाच्या दृष्टीने रेल्वे विस्तार होणे आवश्यक आहे. पालघर जिल्हा वेगाने औद्योगिक आणि आर्थिक केंद्र बनत आहे. त्यामुळे रेल्वे नेटवर्क मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करून प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि सुटसुटीत रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या विनंतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
डॉ. हेमंत सवरा – खासदार, पालघर जिल्हा