मशरूम शेतीचा जिल्ह्यात नवा प्रयोग
पालघर : प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा सर्वत्र वाढताना दिसून येत आहे. मग ते कोणतही क्षेत्र असो. महिला शक्ती हि आता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसून येते. शेती क्षेत्रात हि महिलांचा सहभाग आता वाढताना दिसून येत आहे. अशात पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला देखील कुठे मागे राहिल्या नाहीयेत. मुंबई पासून काही अंतरावर असलेला पालघर हा एक आदिवासी बहुल असा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यातल्या महिला देखील पुढे येवून शेती क्षेत्रात नव नवीन प्रयोग करून त्यातून चांगला नफा मिळवू लागल्या आहेत.
पहा व्हिडीओ :
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या बांधघर या गावात राहणाऱ्या महिलांनी आपल्या गावातचं मशरूमच्या शेतीतून ( Mushroom Farming ) चांगला आर्थिक नफा मिळवण्यास सुरवात केली आहे. एकेकाळी केवळ भातशेती करून हिवाळ्यानंतर आपल्या कुटुंबा समवेत घराला कुलूप लावून कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरीत होणाऱ्या या महिला. ज्यांच्या कडे पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या भात शेती शिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. आणि कोणी योग्य दिशादर्शक हि नव्हतं. त्यामुळे पोटाच्या भुकेसाठी आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांना आपल्या परिवारासोबत रोजंदारीच्या कामासाठी भटकावं लागत होतं. मात्र आता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या बांधघर या गावात राहणाऱ्या महिलांनी 20 जणींचा एक गट बनवून या गटाच्या माध्यमातून आणि महिलांच्या एकत्रित सहभागातून गावात मशरूमची शेती करण्यास सुरुवात केली आहे. ज्यातून त्या सक्षम होवू लागल्या आहेत.
सुरुवातीला ग्रामीण भागात काम करणाऱ्या वसई जनहित ट्रस्ट ने या 20 महिलांचा भूमी शेतकरी महिला गट ( Bhoomi Shetkari Mahila Gat ) नावाचा एक शेतकरी गट स्थापन केला. आणि त्यांनतर या संस्थेच्या माध्यमातून कोसबाड हिल कृषि विज्ञान केंद्राच्या ( Kosbad Hill Krishi Vigyan Kendra ) शास्त्रज्ञ रुपाली देशमुख यांनी या महिलांना धिंगरी-अळींबी च्या उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणाचे म्हणजेच ( Oyster Mushroom ) ऑईस्टर मशरूमची शेती करण्याविषयीचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर कृषि विज्ञान केंद्राने स्वतः तयार केलेलं मशरूमचं बियानं लागवडीसाठी या महिलांना दिलं. या सर्व महिलांनी मिळून घरच्या जवळच्या मोकळ्या जागेत आणि अगदी कमी खर्चात मशरूमसाठी आवश्यक असलेलं अशी एक खोली तयार केली. त्यात बांबूचे रॅक तयार केले. आणि त्यावर हे मशरूमचे बियाणे भरलेले सिलेंडर ठेवले.
यासाठी भाताच्या पावोलीची आवश्यकता असते. या भाताच्या पावोलीचे छोटे छोटे तुकडे करून ते गोण्यांमध्ये भरून गरम पाण्यात उकडवले जातात. त्यांतर त्यातून पूर्ण पाणी काढले जाते. आणि त्यातला ओलावा संपे पर्यंत त्याला सुकवलं जातं. त्यांतर एका प्लास्टिक बॅग मध्ये भाताची पावोली आणि त्यात मशरूमचे बियाणे टाकले जाते. त्या बॅग काही काही अंतरावर छिद्र केले जातात. जेणेकरून मशरूम ला बाहेर येण्यासाठी जागा मिळू शकेल. त्यानंतर हे भरलेले सिलेंडर त्या अंधा-या खोलीत ठेवली जातात. साधारणत: 20 ते 22 दिवसांनंतर हळूहळू मशरूम यायला सुरुवात होते. 20 ते 25 अंश सेल्सिअस तापनात या पिकाची वाढ चांगली होते. त्याचबरोबर 80 ते 85 टक्के अद्र्तेची आवश्यकता असते. अशा वातावरणात वर्षभर मशरूमचं उत्पादन घेता येत.
या गावातल्या महिला ऑईस्टर जातीच्या मशरूमची शेती करतात. आणि हि शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते. लागेल त्याप्रमाणे या महिला कोसबाड हिल कृषि विज्ञान केंद्राकडून मशरूमचे बियाणे विकत आणत असतात. या महिलांनी आठवड्यातील दिवसांनुसार आपले तीन-तीन जणींचे ग्रुप तयार करून घेतले आहेत. त्यानुसार आळीपाळीने त्या शेतीची देखभाल करतात. महिलांचे हे ग्रुप वगवेगळ्या गावात विक्री साठी जात असतात. जवळपासच्या गावात त्यांच्या मशरूमची चांगली विक्री होते. त्यामुळे त्यांना बाजारपेठेपर्यंत जाण्याची आवश्यकता भासत नाही. बाजारात त्या 300 किलो प्रमाणे या मशरूमची विक्री करतात. ज्यातून त्यांना चांगला नफा होत आहे. एका वर्षापूर्वी या महिलांनी सुरु केलेल्या लहानश्या शेतीला आता मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळे या आदिवासी महिला आता या शेतीतून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवत असून त्या आत्मनिर्भर देखील झाल्या आहेत.