मायलेकीचा खाली दबून मृत्यू, अनेक जण जखमी
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या नारंगी रोड वरील चामुंडा नगर आणि विजय नगर यांच्या मध्ये असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजल्याच्या इमारतीचा मागील भाग इमारती खाली असलेल्या चाळीवर कोसळला असल्याची दुर्घटना रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत २४ वर्षीय आईचा आणि तिच्या एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
पहा व्हिडीओ :
इमारतीच्या कोसळलेल्या मलब्याखाली तिथले रहिवासी अडकले असल्याने तिथे वसई विरार महानगरपालिका, अग्निशामक दल आणि एनडीआरएफ 2 टीमच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. आत्ता पर्यंत 11 लोकांना मलब्या खालून बाहेर काढण्यात आलं असून जखमींवर विरार आणि नालासोपाऱ्या मधल्या रिद्धी विनायक हॉस्पिटल, प्रकृती हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल या विविध रुग्णालयां मध्ये उपचार सुरू आहेत.
या इमारतीमध्ये ५० सदनिका असून मलब्याखाली १५ ते २० रहिवासी अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत ११ रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यातील ९ रहिवासी सुखरूप असून २ जणांचा मृत्यु झाला आहे. या घटनेत २४ वर्षीय आरोही जोवील आणि तिच्या एक वर्षीय उत्कर्षा जोवील या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेविषयी माहिती देताना वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितलं की, ही इमारत बेकायदेशीर होती. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी त्यांना महानगरपालिकेकडून २५ मे ला नोटीस पाठवण्यात आली होती. ही बेकायदेशीर इमारत तयार करणाऱ्या बिल्डर विरुद्ध FIR दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.