पालघर( नीता चौरे) : रेल्वेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलामुळे संतप्त प्रवाश्यांनी आज सकाळी जवळपास 5 वाजताच्या दरम्यान अगोदर पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात आणि त्यानंतर सफाळे रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर उतरून गोंधळ करत रेल रोको आंदोलन केलं.
कोव्हिड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतली रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही काळानंतर अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं ठराविक वेळेत महिला प्रवाशांनाही काही अटी-शर्तिसह प्रवास करण्यास मुभा दिली.
रेल्वेच्या अमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेच्या डहाणु रेल्वे स्थानकातुन चर्चगेट पर्यंत जाणा-या 4.40 वाजताच्या पहिल्या उपनगरीय लोकलची फेरी रद्द करण्यात करण्यात येईल. आणि इतर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येईल. दरम्यान काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हे नवं वेळापत्रक 3 डिसेंबरपासून लागू होणार आहे.
रेल्वे प्रशासनानं आता 3 डिसेंबर पासून ट्रेनांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यात कर्मचा-यांसाठी डहाणुहुन चर्चगेटसाठी सुटणारी 4.40 ची पहिली लोकल रद्द करण्यात आली आहे. प्रवाश्यांचं म्हणनं होतं की, या निर्णयामुळे आमचा त्रास वाढेल. त्यामुळे नाराज आणि संतप्त प्रवाशांनी अगोदर पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात आणि त्यानंतर सफाळे रेल्वे स्थानकात ट्रेन ला अडवत रेल्वे रुळावर उतरून गोंधळ केला. यावेळी संतप्त प्रवाश्यांनी मुंबईकड़े जाणार्या राजधानी एक्सप्रेस ला आणि डहाणुकड़े जाणार्या लोकलला काहीकाळ अडवत रेल रोको आंदोलन केलं. प्रवाश्यांचा गोंधळ पाहता मोठ्या संख्येत पोलीस फ़ौजफाटा आणण्यात आला. बरयाच वेळपर्यंत प्रवाश्यांना समजवल्या नंतर आणि ती लोकल रद्द न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर प्रवाश्यांनी आंदोलन मागे घेतलं.