पालघर : पेसाभरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी इथं बारा वाजताच्या सुमारास आमदार विनोद निकोले आणि आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली 27 पेक्षा अधिक संघटनांनी हा रास्ता रोको केला. दरम्यान रास्ता रोकोमुळे महामार्गावरील दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
मागील अनेक वर्षांपासून पेसा भरतीचा प्रश्न सरकारला सोडवता येत नसून सरकारने मध्यस्थी करून आदिवासी संघटना आणि बिगर आदिवासी संघटना यांची बैठक लावून तोडगा काढावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसार यांनी केली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देवून हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं. तब्बल दोन तास या रास्ता रोकोमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाल्यानं या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली