पालघर : पालघर जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना चिकू या पिकांसाठी राबविण्यात येत आहे. 2016 च्या खरीप हंगामापासून चिकू या फळपिकासाठी हवामानावर आधारीत फळपिकविमा राबविण्याबाबत शासनानं मान्यता दिली आहे. तर फळपिकांना प्रतिकुल हवामान घटकांपासून विमा संरक्षण देणं आवश्यक असल्यानं सन 2020 मध्ये मृग बहारासाठी फळपिक विमा योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेत पालघर जिल्ह्याल्या एकूण 4 हजार 361 शेतकऱ्यांनी 3939.73 हेक्टर क्षेत्रासाठी 108.34 लाख रुपये रकमेचा विमा काढला आहे. आणि त्याची विमा संरक्षित रक्कम 2166.85 लाख रुपये आहे. त्यापैकी जिल्ह्यात 4 हजार 057 इतक्या शेतकऱ्यांना 3658.12 हेक्टर क्षेत्रासाठी तालुका आणि महसुल मंडळनिहाय एकूण 1144.25 लाख रुपये इतक्या रकमेचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालघर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी दिली आहे.
महावेध प्रकल्प :
महावेध प्रकल्पाअंतर्गत संबंधित महसुल मंडळात उभारणी केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रात नोंदविलेली हवामानाची प्रमाणीत आकडेवारी ग्राह्य धरण्यात येते. विमा संरक्षण कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग पाच दिवस 90 टक्के पेक्षा जास्त राहिल्यास आणि प्रतिदिन 20 मिमी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस 4 दिवस झाल्यास रु 27,000 रूपये देण्यात येतात. तर या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग दहा दिवस 90 टक्के पेक्षा जास्त राहिल्यास प्रतिदिन 20 मिमी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग 8 दिवस झाल्यास 60,000 रुपये देण्यात येतात.