पालघर : पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना विषाणु चा संसर्ग वाढत असून रुग्ण संख्या देखील वाढू लागली आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता या वाढत्या रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी पालघर चे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी येत्या 5 एप्रिलपासून जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू केले आहे.
शाळा, कॉलेज बंद :
पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस हे 5 एप्रिलपासून पुढील आदेश येई पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. मात्र दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या पालकांच्या संमतीनं ऐच्छिक वर्ग घेता येतील. तसचं संस्थांद्वारे ऑनलाईन पद्धतीनं कामकाज सुरु ठेवता येईल. तर राष्ट्रीय / राज्य / विद्यापीठ / शासन / शिक्षण मंडळ स्तरावरील यापूर्वीच जाहीर झालेल्या परीक्षा मार्गदर्शक सुचनांचं पालन करून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दुकानं 7 ते 7 यावेळेत सुरु :
जिल्ह्यातली अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तुंची ( मेडिकल, डेअरी, पेट्रोल पंप ) दुकानं वगळता इतर सर्व दुकानं सकाळी 7 वाजतापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचं सुरु राहतील. 15 एप्रिल पर्यंत पूर्वनियोजित असलेल्या लग्न आणि इतर समारंभांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी घेणं बंधनकारक राहिल. 15 एप्रिलपासून लॉन्स, मंगल कार्यालये, होल्स आदी ठिकाणी लग्न आणि इतर समारंभ आयोजित करता येणार नाहीत.
ज्या ठिकाणी बसण्याच्या टेबलची व्यवस्था आहे अशीचं खाद्यगृह, परमिट रूम / बार हे सकाळी 7 ते संध्याकाळी 9 या वेळेत सुरु राहतील. तर होम डिलिव्हरी किचन / वितरण कक्ष 10 वाजेपर्यंत सुरु राहू शकतील. रस्त्यावरील खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, ठेले, स्टॉल दिलेल्या सूचनांचं पालन करून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहील.
जिम, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदानं, स्विमिंग टैंक हे वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील तर सामूहिक स्पर्धा / कार्यक्रम बंद राहतील. सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम / उत्सव समारंभ पूर्णपणे बंद राहतील. तर धार्मिकस्थळे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील. एका आड़ एक ओटे या प्रमाणे भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहिल. जिल्ह्यातले सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट यात क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तिंची उपस्थिती असू शकेल. जिल्ह्यातले सर्व शोपिंग मोल्स सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतचं सुरु राहतील. अंत्यविधी कार्यक्रमात केवळ 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
होम आयसोलेशन :
ज्या व्यक्तींची RT-PCR चाचणी झाली आहे. त्यांनी रिपोर्ट येईपर्यंत गृह अलगीकरणात राहणं आवश्यक असेल अशी व्यक्ती घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. होम आयसोलेशन साठी बाधित झाल्याच्या दिवसापासून दरवाज्यावर होम आयसोलेशनचं बोर्ड लावण, हातावर होम क्वारनटाईनचा बंधनकारक राहील. अलगीकरणाचं उल्लघंन केल्यास रुग्णाला जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात येईल.
आदेशाचा भंग करणा-यां विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१ (b), भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ़ १८६० ) च्या कलम १८८ व साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमानुसार योग्य ती कायदेशीर करवाई करण्यात येईल.
जिल्ह्यात आज 283 नव्या रुग्नांची नोंद :
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 45 हजार 695 इतके रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतलेत. तर जिल्ह्यात आज 283 नव्या रुग्णाची नोंद झाली. त्यात पालघर तालुक्यातल्या 65, वसई ग्रामीण भागातल्या 3, वाडा तालुक्यातल्या 15 अशा एकुण 83 आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 200 रुग्नांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना बाधित रुग्नांची आतापर्यंतची एकुण संख्या ही 48 हजार 891 इतकी झाली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 32 हजार 122 इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या 16 हजार 769 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या मृतांची संख्या आता 1 हजार 221 झाली आहे. तर सध्या जिल्ह्यात 1975 अक्टिव केसेस आहेत.