पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्या मधल्या ब्राम्हणगावातल्या अनंता बाळू मौळे यांच्या घरात आणि दुकानात रविवारी रात्री 2.30 वाजताच्या दरम्यान सर्किटमुळे लागलेल्या आगीत अनंता मौळे यांच्या आई, पत्नी, मुलगी, आणि मुलगा या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर त्यांची इतर दोन मुलं या आगीत भाजली असून त्यांच्यावर नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसचं अनंता मौळे यांच्या डोक्याला दुखापत झाली असल्यानं त्यांच्यावर मोखाड्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या आगीत एकाच घरातल्या आई गंगुबाई बाळू मौळे, पत्नी द्वारका अनंता मौळे, मुलगी पल्लवी अनंता मौळे (15), आणि मुलगा कृष्णा अनंता मौळे (10) या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनंता यांचा आणखीन एक मुलगा भावेश अनंता मौळे (12), आणि मुलगी अश्विनी अनंता मौळे (17) हे भाजले असून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट :
कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज नाशिक जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. उपचारात कोणत्याही प्रकारची कमतरता येऊ नये आणि जखमींच्या उपचाराचा दैनंदिन अहवाल द्यावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी नाशिकच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेखाराव खंडे यांना दिलेत.
यावेळी मोखाड्याचे तहसीलदार वैभव पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीनिवास, अमित पाटील आदी उपस्थित होते.