पालघर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात सर्वत्र 5 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत कड़क निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसून येतोय. या अनुषंगानं पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी 5 एप्रिलच्या संध्याकाळी 8 वाजता पासून ते 30 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागु केला आहे.
आज जिल्ह्यात सर्वत्र या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसून आली. जिल्ह्यात आज किराणा, औषधं, फळाची दुकानं आदी जीवनावश्यक आणि आवश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकानं पोलिसांकडून बंद करण्यात आली आहेत. पोलिसांनी ठीकठिकाणी जावून इतर सर्व दुकानं बंद करावयास लावली. वाहतुक सेवा मात्र सुरळीत सुरु आहे.
दिवसा जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. तर रात्री ८ वाजतापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. या आदेशाचा भंग केल्यास त्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.