पालघर : पालघर जिल्ह्यात 21 जून ते 1 जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन कृषि संजीवनी मोहीम साजरी करण्यात येत आहे. याच कृषि संजीवनी मोहिमे अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्या तालुक्या मधल्या सातुर्ली (वडपाडा) या गावात शेतकरी सोमनाथ भोये यांच्या शेतात भात रोपं लागवड करताना करावयाची ऍझोटोबॅक्टर आणि पि.एस.बी. ची प्रक्रिया, चार सूत्री पद्धतीनं भात लागवड तसचं बांधावर तूर लागवड करणं याबाबत मोखाडा तालुक्याचे कृषी अधिकारी सुनील पारधी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
कृषि संजीवनी मोहिमे अंतर्गत राबवण्यात येणारे उपक्रम :
या मोहिमे अंतर्गत भात रोपवाटिका कीड रोग मार्गदर्शन करणं, बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड आणि तंत्रज्ञान प्रसार, तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतक-यांचा सहभाग, जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या पिकांसाठी कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना, कृषी दिन यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
यावेळी खोडाळ्याचे मंडळ कृषी अधिकारी सुरेश तमखाने, पोशेरा सजेचे कृषि पर्यवेक्षक व्हि. वाय.पाटील, कृषी सहाय्यक ए.वाय. बाविस्कर, एस.एम. शिंदे, आनंद गवई, बि.एम.लांबाडे तसचं शेतकरी बांधव उपस्थित होते.