पालघर : पालघर जिल्ह्यात रात्री ढगांच्या गडगडासह आणि विजांच्या कडकडासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातल्या बोईसर, डहाणु, पालघर, नालासोपारा, चिखले आणि इतर जवळपासच्या भागातल्या परिसरांत ठिकठिकाणी पाणी भरलं आहे. त्यामुळे वाह्तुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
तर अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सखोल भागात रहणा-या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं. तर अनेकांच्या गाड्या पाण्यात बुडाल्या. नालासोपारा आणि इतर आसपासच्या भागांत मुसळधार पावसामुळे पाणी भरल्यानं या परिसरांनी तलावाचं रूप घेतल्याचं चित्र दिसून येत आहे. डहाणु बस डेपो मध्ये पाणी भरल्यानं तिथल्या बसेस अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्याचं चित्र दिसून आलं.
रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पच्छिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात सकाळी रेल्वे रुळावर पाणी भरल्यानं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून रेल्वेसेवा उशिरानं सुरु आहे. त्यामुळे प्रवाश्यांना तात्कळत उभं राहून ट्रेनची वाट पहावी लागत आहे. मिळालेल्या अहवाला नुसार जिल्ह्यात आज सरासरी ११६. ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.