पालघर : वारी विरोध, वारक–यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकाचा अपमान आणि जेष्ठ किर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजर कैदेचा विरोध म्हणून विश्व हिंदू परिषद आणि समस्त वारकरी संप्रदायाकडून आज पालघर मध्ये भजनी आंदोलन करण्यात आलं. यावेळी पालघर मधल्या राम मंदिरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत डोक्यांवर तुळश्या घेवुन आणि भजन म्हणत रैली काढण्यात आली. आणि आपल्या मागण्या संदर्भातलं एक निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलं.
राज्य सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटाचा फायदा घेत पोलीस प्रशासनाच्या बळानं वारक-यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत. कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक, त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे.
त्यामुळे कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना आणि जागो जागी अडवणुक केलेल्या वारक-यांना सन्मानपूर्वक मुक्त करावं, आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध मठामध्ये चालणारे चातुर्मास सेवा आणि मंदीरातले पारंपरिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तने, प्रवचनं, दर्शन यावरचे प्रतिबंध दूर करावेत. या अनुष्ठानांना 50 टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी हे भजनी आंदोलन करण्यात आलं.
राज्य सरकारनं वारकर-यांच्या मागण्यां संदर्भात निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्र व्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला. आणि या आंदोलना नंतरही साधू संतांची, वारकर-यांची होणारी अवहेलना न थांबवल्यास येत्या काळात वारकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपुर पेटर्न राबवण्यासाठी रस्त्यावर उतरेल असं ही या निवेदनात म्हणण्यात आलं आहे.