पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्या मधल्या पोमण आणि भाताणे या दोन ग्रामपंचायतींना इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनचं ( आय.एस.ओ – ISO ) मानांकन मिळालं आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गावात केलेल्या विकासकामांमुळे या ग्रामपंचायतींनी तालुक्यात आपली एक नवीन ओळख निर्माण केली असून या दोन्ही ग्रामपंचायतींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातल्या १०० ग्रामपंचायती आयएसओ ( ISO ) करण्याची प्रशासनाची तयारी असून त्या दृष्टीनं प्रयत्न सुरु आहेत. वसई तालुक्यातील जवळपास १० ग्रामपंचायती जुलै अखेरीस आय.एस.ओ होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
भाताणे गावची लोकसंख्या ५ हजार ९०० इतकी असून पोमण गावची लोकसंख्या ही २ हजार ५०० ते ३००० इतकी आहे. या गावात जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या संकल्पनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात आलेत. यात ग्रामपंचायतीच्या ३३ नमुन्यांसह एकूण ५१ निकषांचा समावेश असतो. यात ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प, जन्म मृत्यू नोंदणी, घरपट्टी वसुली, स्वच्छता, कर्मचारी नेमणूक, तीन वर्षांच्या कर्मचाऱ्यांचे ऑडिट, घनकचरा व्यवस्थापन, पाणी, सांडपाणी नियोजन, संगणकीकृत सेवा, ग्रामपंचायत कर्मचारी यांचं वर्तन, त्यांना दिलेला ड्रेसकोड आदी निकषांचा आधार घेत या सर्व बाबींचं नियोजन योग्य असेल तर त्या ग्रामपंचायतीला ‘आय.एस.ओ’ मानांकन देण्यात येतं.
आय.एस.ओ चे अधिकारी अनिल येवले यांनी गावांची पाहणी करून अहवाल तयार केला. आणि सर्व निकषांत पोमण आणि भाताणे ग्रामपंचायतीं पास झाल्या. त्यामुळे हे मानांकन तालुक्यासाठी एक मानाचं पान आहे. या दोन्ही गावांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात विविध कामं केली.
पोमण गावात असलेली गावठाण जमीन अतिक्रमण हटवून ताब्यात घेत या ठिकाणी सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आलं आहे. तसचं या जागेत भविष्यात गावातल्या नागरिकांसाठी लागणाऱ्या वास्तू जसं क्रीडांगण, व्यायामशाळा, वाचनालय आदी उभारण्याचा या ग्रामपंचायतीचा मानस आहे.