पालघर : शेतातील उत्पादन वाढीसाठी अनेक शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. अशा उत्पादन वाढीच्या प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य शासनाच्या कृषी विभागानं पिक स्पर्धा आयोजित केली आहे. पालघर जिल्ह्यात पिक स्पर्धेत भात आणि नाचणी पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत विजयी होणा-या शेतकऱ्यांना रोख रक्कमांचं बक्षीस ही कृषी विभागाकडून दिलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीचे विविध प्रयोग राबवून या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जिल्ह्यात भात पिकाला आंतर पिकाची जोड देऊन उत्पादन वाढीसाठी गेल्या काही वर्षापासून भाता सोबत तुरीचं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यासाठी भात शेती बांधावर तूर लागवडीसाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याना बियाणे देण्यात येतायेत. तसचं विविध पुरस्काराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी सकारात्मक वातावरण तयार केलं जात.
आणि याचाच एक भाग म्हणून भात आणि नाचणी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी बळ मिळावं या उद्देशानं जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यासाठी या पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या राज्य स्तरीय स्पर्धेचं संचालन प्रत्येक तालुक्यात केलं जाणार आहे. या स्पर्धेत भात आणि नाचणी या पिकाची लागवड केलेले शेतकरी सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7/12 उतारा आणि 8अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पिकाची किमान 10 गुंठे पेक्षा जास्त क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येतील. शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
स्पर्धेत भात पिकाची पिक कापणी कृषी अधिकाऱ्यांसमोर करावी लागणार आहे. अधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात येतील. आणि त्यांना रोख रुपयांचं बक्षीस, प्रमाणपत्रानं गौरविलं जाणार आहे.