मुंबई : मुंबईतील काही रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत सोमवार पासून आता 10 एवजी 50 रूपये इतकी असणार आहे. ही दरवाढ तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात अलार्म साखळी ओढण्याच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
9 मे पासून ते 23 मे पर्यंत अशा 15 दिवसांसाठी ही वाढ निश्चित करण्यात आली. आता सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर प्लॅटफॉर्म टिकिटच्या दरात वाढ करण्यात आली असून येथे प्लॅटफॉर्म टिकिटची किंमत आता 50 रूपये एवढी झाली आहे. अलिकडे अनेक गैरप्रकार वाढले आहेत. साखळी खेचून ट्रेन थांबवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच रेल्वे प्रवासावरील नियमांची मर्यादा हटवल्यानंतर लोकलमधील गर्दी देखील बरीच वाढली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.